संत नरहरी महाराजांनी परमार्थ मार्गाची शिकवण दिली – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (२७ फेब्रुवारी) कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील श्री नरहरी-विठ्ठल मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेऊन आरती केली. संत नरहरी महाराजांनी परमार्थ व अचूक व्यवहार कसा करावा‎ याची शिकवण समाजाला दिली. त्यांनी दाखविलेला अध्यात्माचा मार्ग व्यवहार आणि परमात्म्याला जोडणारा आहे, असे प्रतिपादन कोल्हे यांनी केले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी कोपरगाव शहरातील पांडे गल्लीत असलेल्या श्री नरहरी-विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहलता कोल्हे यांनी संत नरहरी महाराज व श्री विठ्ठल मूर्तीला पुष्पहार अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले.

सर्व नागरिकांना सुख, समाधान, आनंदी व निरोगी आयुष्य लाभू दे, सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे, सर्व अडचणींवर मात करून जनकल्याणासाठी काम करण्यास ऊर्जा मिळू दे, अशी प्रार्थना त्यांनी ‘श्रीं’च्या चरणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित महिला व नागरिकांशी संवाद साधला. सुवर्णकार समाजाच्या वतीने महिला अध्यक्षा संगीता शहाणे व सुवर्णा भडकवाडे यांनी स्नेहलता कोल्हे यांचा सत्कार केला. 

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, संत शिरोमणी नरहरी‎ सोनार महाराज हे वारकरी संप्रदायातील महान संत होते. ते वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते. दैनंदिन व्यवहार आणि प्रपंच करतानादेखील परमेश्वराची भक्ती आणि उपासना होऊ शकते, याचा प्रत्यय त्यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिला. वारकरी संप्रदायामध्ये विविध जाती-जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. यात संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता. ते कट्टर शिवोपासक होते. ते एकदा पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाच्या कमरेला सोनसाखळी बांधत असताना पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे.

शिव आणि विष्णू भिन्न नाहीत तर एकच आहेत, हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत, असा साक्षात्कार त्यांना झाला. या साक्षात्कारानंतर नरहरी महाराजांच्या मनात असलेला हरि-हराचा वाद मिटला व ते पांडुरंगाचे निस्सीम भक्‍त बनले. समाजात, वेगवेगळ्या पंथांमध्ये असलेला हरि-हराचा वाद मिटवण्यासाठी ते आयुष्यभर झटले. संत नरहरी‎ सोनार महाराज यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. सर्वांनी संत नरहरी‎ सोनार महाराज यांची शिकवण आचरणात आणली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. यानिमित्त चंद्रकांत नारायणशेठ नागरे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

 याप्रसंगी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, विजय भडकवाडे, तुलसीदास खुबाणी, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, पंडित यादव, चंद्रकांत नागरे, कृष्णा उदावंत, अनिल जाधव, प्रकाश भडकवाडे, अरुण उदावंत, नंदकुमार विसपुते, काशीनाथ नागरे गुरुजी, अॅड. वसंत कपिले, संतोष देवळालीकर, राहुल देवळालीकर, ज्ञानेश्वर गोसावी, संजय खरोटे, राजेंद्र मंडलिक, ओम बागुल, संजय मंडलिक, वैशाली उदावंत, शिल्पा नागरे, दीपा उदावंत, संगीता उदावंत, अंजली भडकवाडे, बेबी भडकवाडे, सारिका नागरे, रेणुका उदावंत, सारिका देवळालीकर, सुनंदा दहिवाळ, पूजा देवळालीकर, माधुरी देवळालीकर यांच्यासह सुवर्णकार समाजबांधव, माता, भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.