संशोधन हा उच्च शिक्षणाचा अविभाज्य घटक – प्राचार्य डॉ. झावरे

शेवगाव प्रतिनिधी, दि.०१ : उच्च शिक्षण हे संशोधनाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्याकरिता संशोधन हे प्राथमिक आणि नाविन्यपूर्ण असले पाहिजे. संशोधकामध्ये प्रामणिक पणा चिकित्सक वृत्ती, कुतूहल व निरीक्षण शक्ती असणे आवश्यक असून संशोधकांनी मनन, वाचन, व चिंतन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नगरच्या न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर झावरे यांनी केले.

शेवगाव येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय एक आदिवासीय ‘संशोधन कार्यप्रणाली’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी डॉ. झावरे यानी संशोधन (Research), शोध (Invention), आणि नवीनता (innovation) या संकल्पनेतील फरक सांगून भारतातील आणि विदेशातील वर्तमान संशोधनाचे स्वरूप स्पष्ट केले.

प्रथम सत्रात प्रेमराज सारडा महाविद्यालयाच्या डॉ. माहेश्वरी गावित यांनी ‘संशोधनाची व्याप्ती’ या विषयावर मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात अहमदनगर महाविद्यालयाच्या डॉ. माया उंडे यांनी अंतरविद्याशाखीय संशोधन पद्धती या विषयावर तर तृतीय सत्रात चांदवडच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे डॉ. सुदिन दळवे यांनी संशोधन पद्धतीतील नवीन प्रवाह या विषयावर संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच प्राध्यापकांना संशोधन प्रकल्प कसा तयार करावा आणि संशोधनासाठी ज्या शैक्षणिक संस्था अर्थसाह्य करतात त्यांची माहिती दिली. नवीन शैक्षणिक धोरणात संशोधन हा विषय पीजी साठी अभ्यासक्रमात येऊ घातला आहे. त्यामुळे संशोधनावर कार्यशाळा घेण्याची गरज भासत आहे, संशोधन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी अध्यक्षीय समारोप प्रसंगी व्यक्त केले. प्रा.सोपान नवथर यांनी सुत्र संचलन केले. प्रा. राजेश वळवी यांनी आभार मानले.