शेवगाव गोळीबार प्रकरणात एकाचा मृत्यू
शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : येथील शेवगाव-गेवराई मार्गावरील एका हॉटेल जवळ रविवारी दुपारी झालेल्या गोळीबार प्रकरणात पिण्या कापसे याला मारण्यासाठी गेलेल्या टोळीतील दोघांनी पिस्टल फायर करून केलेल्या गोळीबारात गोळीचा नेम चुकला आणि तो वाचला. मात्र नंतर झालेल्या जबर मारहाणीत स्वतःच जबर जायबंदी होऊन स्वतःचा जीव गमावण्याची पाळी मारेकऱ्यावर आल्याची घटना काल घडली.
या संदर्भात शेवगाव पोलीस ठाण्यात, पिण्या कापसे याला मारण्यासाठी आलेल्या टोळीतील राजेश गणेश राठोड (वय २८ बजरंगनगर पोस्ट – बान्सी ता. पुसद जि. यवतमाळ) याने दिलेल्या फिर्यादीवरुन पिण्या कापसे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत जबर जखमी झालेल्या अर्जुन पवार, ता.पुसद, जि.यवतमाळ याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यास पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. तेथे त्याचा आज सोमवारी सायंकाळी औषधोपचार चालू असतांना मृत्यू झाला आहे.
त्याचा साथीदार राजेश राठोड याने दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले की, मित्र अर्जुन संजय पवार यास अन्वर (पूर्ण नाव माहित नाही) याने फोन करुन सांगितले की, तुमच्यासाठी एक काम आहे, तुम्ही शेवगाव येथे या, त्यानुसार आम्ही २९ फेब्रुवारी रोजी येथे आलो. दाखल झाल्यावर अन्वर घेण्यासाठी आला, त्याने पाथर्डी जवळील एका शेड मध्ये सोडल्यावर तो तेथून निघून गेला. रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अन्वर हा डिके व गणेश यांना घेऊन आला. त्यांना सोडून तो पाथर्डीला गेला. चौघे जण तिथे मुक्कामी होते.
दुसऱ्या दिवशी १ मार्च रोजी संदीप मच्छिंद्र पवार याने त्याच्या मोबाईल मधील एक फोटो दाखवत हा पिण्या कापसे असून त्याची व माझी दुश्मनी आहे, त्याला संपवायचे आहे असे सांगितले. २ मार्च रोजी सकाळी संदीप पवार याने लवकर आवरा, आपल्याला लोकेशनवर जायचे आहे. असे सांगितले. यावेळी संदीप याने दोन पिस्टल व तीन कोयते दाखवून त्याच्याजवळ ठेवले. त्यांनतर सर्व वेगवेगळ्या मोटारसायकल वरुन शेवगाव येथे आल्यावर, ज्या इसमाला मारायचे होते त्याचा शोध घेतला, मात्र तो मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा शेडवर आलो.
३ मार्च रोजी संदीप व अन्वर शेड वर दाखल झाल्यावर संदीप याने एक पिस्टल गणेश कडे तर दुसरे डिके याचे कडे दिले. यावेळी त्याने ज्याला मारायचे आहे, तो हॉटेल न्यू शुभम शेजारील रसवंती गृहात बसलेला आहे. दोन मोटार सायकल वरुन आम्ही सर्व जण तिथे पोहचलो. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास डीके याने गाडीवरुन उतरत त्याच्या कडील पिस्टल मधून फायर केला, मात्र फायर झाला नाही.
यावेळी गणेशाने त्याच्याकडील पिस्टल काढून दोन राऊंड फायर केले, मात्र ते ही पिण्या कापसे याला लागले नाहीत. त्यानंतर आम्ही तिथून निघून जात असताना पिण्या कापसे याने काळया रंगाच्या स्कार्पिओने मोटरसायकलला पाठीमागून येऊन जोराची धडक दिली. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या ७ ते ८ अनोळखी इसमांनी अर्जुन याला लाकडी दांडके, दगडाने जबर मारहाण केली.
यावेळी पिण्या कापसे हा ओरडून, बाप्पा विघ्ने यांना सोडू नको, मारुन टाका असे सांगत होता. यावेळी गणेश व राजेश यांनी तिथून पळून जात जवळच्या उसाच्या शेतात लपून बसले. पिण्या तिथे येऊन त्याच्या साथीदारांना यांना मारुन टाका असे म्हणून मारहाण करीत असताना पोलीस तिथे आल्याने आमची सुटका झाली. असे फिर्यादी मध्ये म्हटले आहे. दरम्यान पिण्या कापसे हा देखील जखमी असून त्यास नगर येथे औषधोपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.