मढी.बु.प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांस मान्यता १.३० कोटी निधीस मंजुरी – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ :- कोपरगाव तालुक्याच्या मढी बु. व परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्हा वार्षिक योजना २०२३/२४ सर्वसाधारण योजने अंतर्गत नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास मंजुरी देण्यात आली असून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारत बांधकामासाठी १.३० कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. 

जागतिक कोरोना महामारीत अपुऱ्या अर्थव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या अडचणी पुन्हा निर्माण होणार नाहीत. याची आ. आशुतोष काळे यांनी पुरेपूर काळजी घेतांना कोपरगाव मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे. यासाठी आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर दिला आहे. त्या दृष्टीने वाटचाल करीत असतांना कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी मिळविली आहे. त्यासाठी तब्बल २८.८४ कोटी निधी त्यांनी मिळविला असून लवकरच उपजिल्हा रुग्णालयाचे काम सुरु होणार आहे.

त्याचबरोबर माहेगाव देशमुख येथे ४ कोटी निधीतून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारण्यात आले असून लवकरच नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे. त्याचबरोबर संवत्सर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० बेडचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करून व कर्मचारी वसाहतीसाठी २२.७८ कोटी निधी मिळविला असून हे काम सध्या प्रगतीपथावर असून पूर्व भागातील कोपरगाव-वैजापूर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या तिळवणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळावी यासाठी प्रस्ताव दाखल करून त्याबाबत त्यांचा पाठपुरावा सुरु आहे.

आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत अतिशय सजग असलेल्या आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील नागरिकांना सहजपणे आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी २०१९ पूर्वी चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे नूतनीकरण करून रुळावरून घसरलेली आरोग्य व्यवस्था पुन्हा रुळावर आणली. २०१९ नंतर सत्ता मिळाल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय, संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर व नागरिकांच्या सोयीनुसार आवश्यक त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र उभारण्यावर भर दिला आहे.

त्या माध्यमातून मढी बु. व परिसरातील नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा व सुविधा उपलब्ध होवून किरकोळ आजारांवर गावातच प्राथमिक उपचार व्हावे यासाठी नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास मंजुरी मिळवीण्यात आ. आशुतोष काळे यांना यश आले असून त्यासाठी १.३० कोटी निधीस प्रशासकीय मान्यता देखील त्यांनी मिळविली आहे.

त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार, महसूल मंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांचे आभार मानले आहे. मढी बु. येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून मढी बु. व परिसरातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.