सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व्यक्ती आणि विचार पुस्तकाचे प्रकाशन

 कोपरगांव प्रतिनिधी, दि.२४ : संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची दुसरी पुण्यतिथी व ९५ व्या जयंतीनिमित्त पत्रकार महेश जोशी यांनी संपादित केलेल्या सह‌कारमहर्षी शंकरराव कोल्हे व्यक्ती आणि विचार या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी कोपरगांव तहसिल कार्यालयाशेजारील ज्ञानेश्वरनगर मैदानावर श्रीगोदावरीधामचे महंत रामगिरी महाराज व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प.पू. रमेशगिरी महाराज, माजीमंत्री राम शिंदे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आदींच्या हस्ते शनिवारी करण्यांत आले. 

   माजीमंत्री स्व शंकरराव कोल्हे यांनी त्यांच्या समाजिक, राजकीय जीवनांत विविध विषयावर लिहीलेल्या लेखांचे व त्यांच्या वैशिष्टपूर्ण कार्याची नोंद घेत इतर मान्यवरांनी केलेल्या लिखाणाचे संकलन वीरेंद्र मधुकर जोशी यांनी केले त्यातून या पुस्तकाची निर्मीती झाली. या पुस्तकाचे सर्व संपादन पत्रकार महेश मधुकर जोशी यांनी केले. पुस्तक सजावट, निर्मातीत सर्वेश व मयुर जोशी यांनी मोलाची साथ दिली. या पुस्तकाची प्रस्तावना परमपूज्य रमेश गिरी महाराज यांनी लिहिली आहे. 

   सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व्यक्ती आणि विचार या पुस्तकात स्व. शंकरराव कोल्हे यांचे नवे सहस्रक – जैव तंत्रज्ञान, समन्यायी पाणी वाटप, माझी दिवाळी, छंद त्याचप्रमाणे वसंतदादा शुगरइन्स्ट्युटचे माजी महाव्यवस्थापक शिवाजीराव देशमुख, कार्यकर्ता विद्यापीठ (विवेक कोल्हे), चिंतनशील नेता  (अरुण खोरे), सहकार (वसंत दोशी), संशोधक (डॉ. अनिल खर्चे) आठवण (स्व. सुधाकर जोशी) पाणीदार नेता (आप्पासाहब दवंगे) विकासमय हिरा, शेतकरी पुत्र, दृष्काळ हक्काचे पाणी (महेश जोशी), विधिमंडळ (प्रा. साहेबराव दवंगे), माझा पांडुरंग (राजेंद्र पाटणकर), साखर उद्योगाचा शब्दकोश (भागा वरखडे), गोरगरिबांच्या आधारवड (राहुल उगले), मी अनभवलेले साहेब (विविध मान्यवरांचे अनुभव कथन) अशा एकोणावीस लेखांचा संग्रह आहे,

तर मुखपृष्ठाचे आतील व मलपृष्ठावर स्व. शंकरराव कोल्हे यांना त्यांच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक आदि कार्याबददल ७२ वर्षात मिळालेल्या तेरा पुरस्कारांची व  राममंदिर (अयोध्या ) निर्माण कार्यासाठी केलेले अर्थसहाय्य यासह चौदा रंगीत छायाचित्रांचा यात समावेश आहे. पुस्तकाचे टंकलेखन व मुद्रितशोधन सौ. सुप्रिया मयुर जोशी यांनी केले आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे क्षेत्रीय अधिकारी अनंत विष्णू वाघ यांचे मोलाचे मार्गदर्शन याकामी मिळाले.