कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ : संजीवनी उद्योग समूह व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे नुकतेच श्रीमती सिंधुताई कोल्हे (माई) यांचे हस्ते संजीवनी आयुर्वेदा कॉलेज मध्ये अनावरण झाले. यावेळी उपस्थित सर्वांनीच स्व. कोल्हे यांच्या पुतळ्याचे पुजन करून मानवंदना दिली.
पुतळा अनावरण प्रसंगी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीन कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कलावती कोल्हे, मिलींद कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे, ईशान कोल्हे तसेच संजीवनी अंतर्गत विविध संस्थांचे डायरेक्टर्स, प्राचार्य उपस्थित होते.
यावेळी नितीन कोल्हे, बिपीन कोल्हे व स्नेहलता कोल्हे यांनी स्व. कोल्हे यांच्या स्मृतिस उजाळा देत स्व. कोल्हे यांचे कार्य सर्वांनाच प्रेरणा देत राहील, असे सांगीतले. बी. एससी. अॅग्री झाल्यावर भारत सरकारच्या फोर्ड फाऊंडेशनची शिष्यवृत्ती घेवुन ते परदेशात उच्च शिक्षणासाठी गेले. ते तेथेच रमले नाही, परंतु तेथुन प्रेरणा घेवुन परत मायदेशी आले, आणि समाजकारण व राजकारण करीत अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प उभारून लाखोंचे पोशिंदा बनले.