शेवगाव प्रतिनिधी, दि . ४ : तालुक्यातील हातगाव येथील नागेश बंडू गलांडे ( वय २४ ) या गायब झालेल्या युवकाचे प्रेत शुक्रवारी जायकवाडी उजव्या कालव्यात हातगाव शिवारात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, हातगाव येथील नागेश बंडू गलांडे हा युवक गुरवारी सकाळी साडे सात वाजता घरातून निघून गेला असल्याची खबर पोलिसांना त्याचे मामा शिवाजी तुकाराम घोलप यांनी दिली होती. ग्रामस्थ व नातेवाईकानी संभाव्य ठिकाणी त्याचा शोध घेतला परंतु तो आढळून आला नाही. मात्र त्याची मोटारसायकल हातगाव शिवारात जायकवाडी जलाशया लगत ग्रामस्थांना आढळली.
शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास नागेश गलांडे याचा मृत देह कालव्यातील पाण्यात तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलीस हवालदार नानासाहेब गर्जे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थाच्या मदतीने प्रेत कालव्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात आकस्मात निधनाची नोंद करण्यात आली आहे. घटनेचे कारण मात्र समजलें नाही.
नागेशचे पाच दिवसांपूर्वीच २८ तारखेला थाटामाटात लग्न झाले होते. हळद फिटत नाही तोच त्याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याचे मागे एक धाकटी बहीण, आईवडिल, चुलते, चुलती असा असा परिवार आहे शेवगाव न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ, शेवगाव बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. कारभारी गलांडे हे त्याचे चुलते होत.