ॲड. ढाकणे यांची शिवार फेरी

शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रतापराव ढाकणे यांनी शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात बोधेगाव परिसरात शेतात जाऊन शिवार फेरी सूरू केली असून या फेरीत शेतकऱ्यांची व शेत मजुरांची भेट घेऊन आगामी काळात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीची साखर पेरणी  सुरु केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ॲड.ढाकणे यांनी खासदार निलेश लंके यांच्या खांद्याला खांदा देऊन शेवगाव व पाथर्डी तालुका पिंजून काढत लंकेना मताधिक्य देण्यासाठी ताकत पणाला लावली होती. सध्या सत्तेत असलेल्या महायुतीच्या कामकाजाबाबत शेतकऱ्यांना माहिती देऊन या सरकारने राज्याचा काय खेळ खंडोबा चालवला आहे. आणि त्यांचे निर्णय शेतकऱ्यांच्या कसे विरोधातले आहेत. हे पटवून देण्यावर त्यांचा भर आहे.

ॲड. ढाकणे म्हणाले की, आपण या अगोदरही विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. त्यात पराजय जरी झाला असला तरी थोड्या दिवसात लगेच जनतेच्या प्रश्नासाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरून त्यांना न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. येथून पुढच्या काळातही राहणार असून बोधेगाव परिसरात आज पर्यंतच्या एका ही आमदाराने पाणी प्रश्नासाठी लढा न दिल्याने हा भाग अजूनही पाण्यापासून वंचित राहिला असल्याने या भागात शेतीसाठी पाणी कसे येईल. हा आपला मुख्य अजेंडा असल्याने तो प्रश्न पुर्णत्वाकडे नेण्यासाठी मी पुढाकार घेऊन यशस्वी करणार आहे.