मुंबई-नागपूर हायवेवरील पुलावरून दुचाकी घसरुन एकाचा मृत्यू

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २९ : कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी कोंडाजी भागवत भोसले यांचा संवत्सर परिसरात मुंबई – नागपूर हायवेवर दुचाकीचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ( दि. २९ जुलै ) सकाळी सव्वा आठच्या दरम्यान घडली. मृत्युसमयी ते ६८ वर्षाचे होते. संवत्सर येथील गोदावरी काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.

कोंडाजी भोसले हे सोमवारी सकाळी संवत्सर येथून मुंबई – नागपूर राज्य मार्गाने गोदावरी नदीच्या दिशेने आपल्या दुचाकीवरुन निघाले होते. गोदावरी पुलाच्या अलिकडे असलेल्या शृंगेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर अचानक त्यांची दुचाकी घसरुन दुचाकीसह ते पुलावरुन थेट पंधरा – वीस फूट खाली पडले.

वरुन दुचाकी त्यांच्या अंगावर पडल्याने डोक्याला व इतर ठिकाणी त्यांना जबर मार लागला. त्यातच मोठ्या प्रमाणावर रक्तश्राव झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांना कोपरगांव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात येऊन तेथे शवविच्छेदन करण्यात आले.

कोंडाजी भोसले हे संवत्सर येथील प्रगतशील शेतकरी व कांदा व्यापारी होते. त्यांच्यामागे अभय हा मुलगा, सुरेश, प्रा. गणपत, मधुकर ही तीन भावंडे, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. कांदा व्यापारी शंकर भोसले यांचे ते चुलते होते. गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील, कृष्णराव परजणे पाटील, संवत्सरचे उपसरपंच विवेक परजणे, सरपंच सुलोचना ढेपले यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन श्रध्दांजली वाहिली. संवत्सर येथे गोदावरी काठावर सायंकाळी  त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. त्यांच्या अकाली निधनाने संवत्सर पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.