कालव्यातून पाणी उचलण्याचा निर्णय बदलू नये –  स्नेहलता कोल्हे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : कोपरगांव विधानसभा मतदारसंघात अनेक ग्रामपंचायतींना जलजीवन मिशन योजना मंजुर झालेली असुन सदर योजनांचे कामकाज कार्यान्वीत आहेत. मात्र या योजनांसाठीचा उद्भव थेट जलाशयावर ठेवावा असा अजब निर्णय घेतला जातो आहे. त्यामुळे सदर योजना पुर्ण होवुन देखील पाण्याअभावी सदर योजना कार्यान्वीत होवु शकत नाही कारण कोपरगाव तालुका व नांदूर मध्यमेश्वर बंधारा (पीकअप वेअर) जलाशयाचे अंतर जलवाहिनीसाठी सुमारे ९० किलोमिटर असुन सदर ठिकाणांहुन पाईप लाईनने पाणी आणणे सोईस्कर व तसेच आर्थीकदृष्ट्या किफायतशीर होणार नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे सदर निर्णय रद्द करून कालव्यातून पाणी उचलण्याचा निर्णय बदलू नये अशी मागणी माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेस उद्भव हा जलाशय ऎवजी कालवा ग्राहय धरण्यांत यावा याबाबतच्या सुचना आपले स्तरावरून मा. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक यांना देण्यांत याव्या म्हणजे जेणेकरून कोपरगांव विधानसभा मतदार संघातील काम पूर्ण झालेल्या जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत होतील व नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी मागणी पत्राद्वारे कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

जल हैं तो कल हैं या भावनेने देशभरात सुरू जलजिवन मिशन योजना सुरू आहे. जनतेला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी कोपरगाव मतदारसंघात ग्रामपंचायतच्या माध्यमांतून पाठपुरावा करून केला.योजना पूर्ण होऊनही जर पाणी मिळाले नाही तर प्रश्न सुटण्याऐवजी ते वाढतील यासाठी निर्णय घेऊन न्याय द्यावा अशी अपेक्षा कोल्हे यांनी शासनाकडे व्यक्त केली आहे.