शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : शेअर मार्केट मध्ये अधिकचा परतावा देण्याचे आमिष दाखवून तीन कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या रावतळे कुरुडगावच्या युवकाला पुणे येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली. सदरची कारवाई पुणे व शेवगाव पोलिसांनी केलेल्या संयुक्त पथकाने केली आहे.
कैलास सुभाष राऊत ( रा. रावतळे कुरुडगाव ता. शेवगाव ) यांनी किया कंपनीची सोनेट गाडी क्र. एमएच १६ डी जी ९५१८ ही शंकर रावसाहेब शिंदे याने चोरुन नेल्याची फिर्याद १० जुलै रोजी दाखल केल्याने त्याच्या विरोधात वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शेअर मार्केटच्या नावाखाली प्रती महिना दहा ते बारा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून तालुक्यातील जनतेची फसवणुक करुन तो फरार झाला होता. याबाबत फिर्यादी सोपान माधव काळे, रा. कुरुडगाव यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये, एसआर इनव्हेस्टमेंट नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी सुरु करुन तीन कोटी पंधरा लाख रुपयांची फिर्यादी व त्यांचे साक्षीदारांचा विश्वास संपादन करुन फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सदर दोन्ही गुन्ह्यातील आरोपी शंकर रावसाहेब शिंदे यास शेवगाव पोलीस स्टेशन तसेच दरोडा वाहन पथक, पुणे यांच्या संयुक्त पथकाने सापळा रचून ताब्यात घेत अटक केली आहे. सदर आरोपी कडून आणखी कोणाची फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलीस सहायक निरीक्षक भास्कर गावंडे, पोलीस कर्मचारी परशुराम नाकाडे, निलेश म्हस्के, नितीन भताने, शाम गुंजाळ, संतोष वाघ, राहुल खेडकर, बप्पासाहेब धाकतोडे, सुरज भावले, समीर फकीर तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे राहुल गुड्डु यांनी केली असून गुन्ह्यांचा तपास धरमसिंग सुंदरडे हे करत आहेत.