शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघात एकूण ३ लाख ६८ हजार ७४३ मतदारांचा समावेश

शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : शेवगाव-पाथर्डी २२२ विधानसभा मतदार संघाची अंतिम मतदार यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, त्यात १ लाख ९२ हजार ४४७ पुरुष तर १ लाख ७६ हजार २९० महिला व इतर सहा, अशा एकूण ३ लाख ६८ हजार ७४३ मतदारांचा समावेश असल्याची माहिती प्रांताधिकारी प्रसाद मते व शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी आज दिली.

भौगोलिक क्षेत्रफळाने व लोकसंख्येने शेवगाव पाथर्डी मतदारसंघ सर्वाधिक मोठा आहे. या अगोदर  दि.५ जुलै रोजी मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती, त्यात ३ लाख ६२ हजार ७०४ मतदारांचा समावेश करण्यात आला होता; परंतु निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुर्ननिरीक्षण मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत विधानसभा मतदारसंघात मतदारांच्या संख्येत ६ हजार १९२ ने वाढ झाली तर  १ हजार ७८२ मतदार कमी झाल्याची माहिती देण्यात आली.

शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील महसूल विभागातील विशेषतः निवडणूक शाखेतील अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या एकत्रित सामूहिक प्रयत्नातून शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतील मतदारांच्या संख्येपेक्षा सर्वाधिक आहे.

या  मतदारसंघात शेवगाव तालुक्यातील शेवगाव नगरपरिषदेसह एकूण ११३ गावांचा तर पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी नगरपरिषदेसह १०१ गावांचा समावेश असून, शेवगाव तालुक्यातील मतदान केंद्राची संख्या १९९ तर पाथर्डी तालुक्यातील मतदान केंद्राची संख्या १६९ असल्याचेही मते व सांगडे यांनी सांगितले.           

  शेवगावचे निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार राजेंद्र बकरे महसूल सहाय्यक सुरेश बर्डे, श्रीकांत गोरे हे या वेळी उपस्थित होते. १८ वर्षे वय पूर्ण झालेल्या मतदारांची मतदार नोंदणी प्रक्रिया कायम सुरू असून थेथील १८ वर्षे वय पूर्ण झालेल्या नवोदित युवक- युवतींनी आपली मतदार नोंदणी करून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट झाल्याची खात्री करून घेण्याचे आवाहन निवडणूक शाखा नायब तहसीलदार बकरे यांनी केले आहे. 

Leave a Reply