अंतर्गत नाराजीमुळे भाजपा कार्यकर्त्यांच्या नियुक्त्याना स्थगिती

शेवगाव प्रतिनिधी, दि. १६ : दोन दिवसापूर्वी नगरजिल्हा  भाजप पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या. या नियुक्त्या एकाच गटाच्या बाजूने झुकल्या असल्याच्या शेवगाव मतदार संघातील भारतीय जनना पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी असून त्या संदर्भात शेवगाव पाथर्डी तालुक्यातील  सुमारे २०० कार्यकर्त्यानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांचेकडे त्यांच्या गावी जाऊन स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली असता भालसिंग यांनी झालेल्या निवडीला लगेच स्थगिती दिली.

       या कार्यकर्त्यांमध्ये माजी दिवंगत खासदार दिलीप गांधी तसेच आमदार मोनिकाताई राजळे यांच्या कार्यकर्त्यांना मुद्दाम डावलण्यात आल्याची या कार्यकर्त्यांची भावना झाल्याने त्यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला. म्हणून त्यांनी आपल्या तीव्र भावना भाजपा जिल्हाध्यक्ष भालसिग यांचे समोर व्यक्त केल्या. या कार्यकर्त्यामधे पक्षासाठी आयुष्य वेचणारे अनेक ज्येष्ठ जून्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा समावेश होता.

त्यांनी नुकत्याच नियुक्ती झालेल्या काहीनी पक्ष आणि नेत्या विरोधात वेळोवेळी भूमिका घेतल्याचा इतिहास असतांना त्यांच्या कडून पक्षाला कसा न्याय मिळणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन जिल्हाध्यक्ष  भालसिंग यांनी केलेल्या नियुक्त्याना स्थगिती दिली.

  येत्या २४ तारखेला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, तेव्हा त्यांच्या उपस्थितीतच पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा निर्णय सामोपचाराने, ज्येष्ठ कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींची मते विचारात घेऊन नवीन पदाधिकाऱ्याच्या निवडीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही भालसिंग यांनी सूचित केल्याचे समजते.  या संदर्भात भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष तथा विद्यमान प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करण्याचा अनेकदा प्रयत्न करूनही तो झाला नाही.

       आमदार मोनिकाताई राजळे यांनी नेहमीच नव्या जुन्या व लहान मोठ्या सर्व स्तरातील कार्यकर्त्यांची सांगड घालून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याने तालुक्यातील सर्व भाजप कार्यकर्ते एक संघपणे आमदार राजळे यांच्या पाठीशी उभे आहेत.
                          गंगाभाऊ खेडकर
       माजी तालुका अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा