साठे पुतळा अनावर पत्रिकेत शिवसेनेचे माजी खासदार लोखंडे यांचे नावाचा विसर?

पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आ. आशुतोष काळे यांच्यावर शिवसेनेची नाराजी 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ : गेल्या अनेक दिवस प्रतिक्षेत असलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोमवार दि. ७ ऑक्टोबर रोजी होत आहे. माजी खा. सदाशिवराव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभेचे प्रतिनिधित्व करत असताना कोपरगावसह राहाता तालुक्यात विविध विकास कामांना प्राधान्य दिले. मात्र कोपरगाव येथे होत असलेल्या या कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव जाणून बुजून नसल्याने कोपरगाव शहर व तालुका शिवसेनेने मोठी नाराज व्यक्त केली आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे व कोपरगावचे आमदार आशुतोष काळे महायुतीचा धर्म पाळत नसतील तर याची किंमत त्यांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मोजावी लागेल असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब राहणे, शिवसेना तालुकाप्रमुख रावसाहेब थोरात व संजय गुरसळ यांनी दिला आहे.

गेल्या आठवड्यात पोहेगाव येथे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी 30 खांटाचे ग्रामीण रुग्णालय विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूर करून घेतले. त्याचेही श्रेय आमदार काळे यांनी सोशल मीडिया व प्रसार माध्यमांना बातम्या देऊन घेतले. अर्थात काम कोणी केले हे जनतेला ठाऊक आहे, मात्र महायुतीत राहुन शिवसेनेच्या नेत्यांना डावलने हे बरोबर नाही.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार हे केवळ देशापुरते मर्यादित राहिले नसून त्यांच्या विचारांचा परदेशातील जनतेनेही स्वीकार केला आहे. मात्र पालकमंत्री व कोपरगावचे आमदार यांचे विचार अत्यंत कमकुवत झाले आहे. ते जाणून बुजून शिवसेनेच्या नेत्यांना बाजूला ठेवत असल्याचे जाणवत आहे. माजी खासदार  सदाशिव लोखंडे यांनी कोपरगावच्या विकासात  मोठी भर घातली आहे.

माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांच्या नगराध्यक्षपदाच्या कालखंडातच या स्मारकासाठी विशेष प्रयत्न झाले. त्यांचे मोलाचे सहकार्य यासाठी राहिले मात्र त्यांचाही विसर प्रशासनाला पडावा ही आश्चर्याची बाब आहे. जाणून बुजून तुम्ही जर असे करत असाल तर शिवसेना गप्प बसणार नाही. तुम्हाला जर महायुतीचा धर्म पाळायचा नसला तर आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत माहायुतीचा धर्म पाळायचा का नाही हे ठरवू आपण वारंवार आमच्या नेत्यांचा अपमान करत आलेले आहात याची सल आम्ही देखील नक्कीच बाहेर काढू.

पालकमंत्री व आमदार यांना सूचना वजा इशारा देताना सांगितले की, आम्ही देखील बाळासाहेबांचे मावळे आहोत. याचे उत्तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत दिल्याशिवाय राहणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही आपण महायुतीचा धर्म पाळा. एक एका मताची किंमत लाख मोलाची आहे. शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग कोपरगाव व राहाता तालुक्यात आहे. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेतून गायब करणे अत्यंत खेदजनक असल्याचे शेवटी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब रहाणे, शिवसेना तालुकाप्रमुख रावसाहेब थोरात व संजय गुरसळ यांनी सांगितले.

Leave a Reply