शेवगाव प्रतिनिधी, दि २२ : शेवगाव-पाथर्डी २२२ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवारी (दि २३) सकाळी ८ ला शेवगाव
तहसील कार्यालयाच्या इमारतीत चोख संरक्षण व्यवस्थेत व सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत होत असून त्यासाठी निवडणुक यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद मते, सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रशांत सांगडे, उध्दव नाईक यांनी दिली.
मतदार संघातील ३६८ मतदान केंद्राची मतमोजणी १४ टेबलांवर २७ फेऱ्यांत होणार आहे. ET P B S Scanning करिता ४ टेबलची व्यवस्था आहे. तर मत मोजणीसाठी ३३ पर्यवेक्षक व ५१ मतमोजणी सहाय्यक अशा ८४ जणाशिवाय राखीव कर्मचारी वेगळे आहेत.
स्ट्रॉगरूम भोवती मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदारसंघात १ लाख ९४ हजार ७४२ पुरुष, १ लाख ७९ हजार ६९४ स्त्रीया, इतर ६ अशा एकूण ३ लाख ७४ हजार ४४२ मतदारांपैकी १ लाख ३७ हजार ६१३ पुरुष, १ लाख २२ हजार १०५ स्त्रीया व इतर ४ अशा एकूण २ लाख ५९ हजार ७२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदार संघात ६९.३६ टक्के मतदान झाले आहे.
मतमोजणी १४ टेबलांवर २७ फेऱ्यांत होणार असून आवश्यकतेनुसार एखादी फेरी वाढू शकते, तर पोस्टल मतमोजणी स्वंतत्र होणार आहे. मतमोजणीस शेवगाव, पाथर्डी, नगर येथील २०० पोलिस कर्मचारी, एक पोलिस उपविभागीय अधिकारी, ३ पोलिस निरीक्षक, ९ उपनिरीक्षक अशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. स्टाँगरूम भोवती सीआरपी १ प्लॅटून, एसीपी गोवा राज्य प्लॅटून, १५ पोलिस व २ पोलिस अधिकारी अशी सुरक्षा व्यवस्था आहे. तहसील कार्यालयाच्या गेटवर व मागील बाजूस पेट्रोलिंग, तसेच गार्ड ठेवण्यात आले आहेत.