समृध्दी महामार्गाच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरवात

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : तालुक्यातून गेलेल्या नागपुर मुंबई या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झालेले आहे. सदरचे रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यक्ता असून ही कामे मार्गी लावण्यासाठी भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिका-यांसमवेत बैठक घेतली. तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांची कामे सुरू करण्याच्या यावेळी सुचना दिल्या.

           राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील समृद्धी महामार्गाचे काम नागपूर ते कोपरगाव पर्यंत पुर्ण झाले त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केले. या  मतदार संघातील 11 गावातून गेलेल्या 29 कि.मी. अंतराचा रस्ता तयार होत आहे. त्यामुळे समृध्दी महामार्गाच्या परिसरातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्याचे सौ कोल्हे यांनी पालकमंत्री व संबंधित अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले होते, महामार्गाच्या कामासाठी लागणा-या साहित्याची वाहतुक करताना परिसरातील रस्त्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतक-यांची दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

ज्या जमिनी महामार्गांच्या कामासाठी गेल्या त्या व्यतिरिक्त उर्वरित राहिलेल्या जमिनीत जाण्यासाठी रस्ते राहिलेले नसल्यामुळे शेतक-यांनी उत्पादित केलेला शेतीमाल बाजारपेठेपर्यंत नेता येत नसल्याने आर्थिक नुकसान होत आहे. तसेच या कामामुळे ग्रामीण मार्ग, शिवरस्ते, वाड्या वस्त्यावरील रस्ते, तसेच दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे या रस्त्यांची दुरूस्ती करणे गरजेचे असल्याच्या यावेळी संबंधित अधिका-यांना सूचना केल्या. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता विश्वनाथ सातपुते, कार्यकारी अभियंता यशवंत पाटील, उपअभियंता सुरेद्र बावा उपस्थित होते. 

           सदर रस्त्यांची कामे सुरू होणार असून यामध्ये तालुक्यातील धोत्रे ते खोपडी, वारी, कान्हेगाव, भोजडे ते वारी, भोजडेचौकी ते कान्हेगाव, संवत्सर ते कान्हेगाव वारी, कान्हेगाव ते गोदावरी, कोकमठाण ते सडे, कारवाडी, कोपरगाव ते शिंगवे, जेउर कुंभारी ते सावळीविहीर फार्म, पुणतांबा फाटा ते झगडे फाटा, सावळीविहीर फार्म, एनएच 160 बी ते सावळीविहीर रस्ता, देर्डे ते पोहेगाव रस्ता, दरडे  को-हाळे एनएच 160 ते पोहेगाव एसएच 65 आदी रस्त्यांच्या कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. 

           या महामार्ग निर्मितीच्या दरम्यान अनेक रस्त्यांची दुरावस्था झाल्याने नागरीकांची गैरसोय दूर व्हावी म्हणून कोल्हे यांनी सदरची कामे तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली तसेच अंडरपास दरम्यान असणा-या बोगद्यामध्ये पाणी साचत असल्याने त्यावरही उपाययोजना करण्याचे काम हाती घेतल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.