कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : मागील अकरा वर्षापूर्वी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून गोदाकाठ महोत्सवाच्या लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर होत असून ह्या गोदाकाठच्या वटवृक्षात बचत गटाच्या महिलांना हक्काची आर्थिक सावली मिळत आहे असे गौरवोद्गार आ. आशुतोष काळे यांनी काढले आहे.
महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी ‘गोदाकाठ महोत्सवा’ चे उदघाटन मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांच्या शुभहस्ते व आ.आशुतोष काळे तसेच जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तरूण कार्यकर्ते माजी उपनगराध्यक्ष स्व.स्वप्नील निखाडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आ.आशुतोष काळे पुढे म्हणाले की, गोदाकाठ महोत्सव सुरु झाल्यापासून महिलांना त्यांचे व्यवसाय उभारण्यास, त्यांच्या घरगुती आर्थिक उत्पन्नात भर घालण्यास आणि त्यांचे आर्थिक आणि सामाजिक कल्याण सुधारण्यास मोठी मदत झाली आहे. त्यामुळे बचत गटाच्या महिलांना दरवर्षी गोदाकाठ महोत्सवाची आस लागलेली असते. दरवर्षी गोदाकाठ महोत्सवात होत असलेल्या आर्थिक उलाढालीचा आकडा वाढतच चालला असून बचत गटाच्या महिलांचे आर्थिक उत्पन्न देखील वाढत आहे आणि त्यांचा आत्मविश्वास देखील वाढला याचे मनस्वी समाधान वाटते.
बचत गटाच्या महिलांसाठी वर्षभर प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ विविध उपक्रम राबवून या बचत गटाच्या महिलांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन करून उद्योग व्यवसायासाठी वित्तपुरवठा मिळवून देत आहे व बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी गोदाकाठ महोत्सव महत्वाची भूमिका बजावत आहे.महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी आजवर नेहमीच पुढाकार घेतला आहे आणि यापुढेही घेणार आहे.
२०२४ च्या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा काम करण्याची संधी दिली. २०१९ च्या निवडणुकीमध्ये केवळ मताधिक्य कमी होते परंतु मतदार संघाच्या विकासाचा वाढलेला आलेख पाहून मतदारांनी तब्बल ऐतिहासिक अशा १ लाख २४ हजार ६२४ मतांनी निवडून दिले आहे. त्यामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली आहे.आपण माझ्यावर पुन्हा एकदा जो विश्वास दाखविला तो विश्वास सार्थ ठरवून निश्चितपणाने विकासाचे सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.
महिला बचत गटाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांना उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण देवून त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी गोदाकाठ महोत्सव सुरु केला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करणे हा गोदाकाठ महोत्सवाचा मुख्य उद्देश गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून साध्य होत असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात ‘गोदाकाठ महोत्सव’महत्त्वाची भूमिका बजावत आहे.-सौ.पुष्पाताई काळे.
या कार्यक्रम प्रसंगी कोपरगाव मतदारसंघातील जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, आशा सेविका, लाडकी बहीण योजनेसाठी मदत करण्याऱ्या स्वयंसेविका यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी विविध शालेय विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, गौतम बँकेचे चेअरमन संजय आगवन, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे व्हा.चेअरमन, संचालक, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक आदी उपस्थित होते.
पुणे फेस्टिवल, बंगलोर फेस्टीवल, नासिक फेस्टिवल अशी नावे आजवर ऐकली होती परंतु कोपरगावात गोदाकाठ नावाने फेस्टिवल होतो हे ऐकून अतिशय आनंद झाला. जवळपास दोन महिने निवडणुका कार्यक्रम सुरु होता निवडणुका आटोपल्यावर सर्व काही शांत झाले असे वाटले होते. परंतु मला एक शायरीची आठवण होते, इक टीस जिगर में उठती है, इक दर्द सा दिल में होता है, हम रात को उठकर रोते हैं, जब सारा आलम सोता है, या पद्धतीने जेव्हा काम असेल तेव्हाही काम आणि जेव्हा काही शांत असेल तेव्हा पण काम आ.आशुतोष काळे करत आहेत. ज्या ठिकाणी पिकते त्या ठिकाणी विकायला पाहिजे हे जरी खरे असले तरी ज्या ठिकाणी पिकते त्या ठिकाणी लवकर विकत नाही त्यासाठी बाजारपेठ अतिशय महत्वाची आहे किंवा आवश्यक त्या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे असते ते काम गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. उत्सव खूप आहेत परंतु आपल्या गावाचा आणि आपल्या गावातील तळागाळातील माणसाचा विकास हा खरा विकास आणि हा खरा उत्सव असून याची अनुभूती गोदाकाठ महोत्सवातून येते. – तहसीलदार महेश सावंत