शेवगाव प्रतिनिधी, दि. १२ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामाध्यमातून एकत्रित कुटुंब पद्धती सारख्या महान भारतीय संस्कृतीची महती सर्वसामान्यापर्यंत पोहचविणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुटुंब प्रबोधन मोहिमेच्या समन्वयक नीलिमा वाघुंदळे यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने येथील बालाजी मंदिरात आयोजित विशेष कार्यक्रमात श्रीमती वाघुंदळे बोलत होत्या. त्यापुढे म्हणाल्या, पूर्वी कुटुंबातील आजी-आजोबा विविध गोष्टींच्या माध्यमातून नवीन पिढीमध्ये संस्कार रुजविण्याचे कार्य व्हायचे. मात्र सध्या कुटुंब व्यवस्था मर्यादित झाल्याने कुटुंबातील लहान बालके आजीबाईंच्या बटव्यापासून वंचित आहेत.

त्यामुळे कुटुंबातील सद्भाव वाढीस लागावा मोबाईलच्या अतिरेकी वापरालाही पाय बंद मिळावा यासाठी पालकांनी स्वतःवर बंधन घालून युवा पिढीला आदर्श संस्काराचे धडे देणे आवश्यक बनले आहे. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संघाचे क्रियाशील कार्यकर्ते वर्षभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सद्भाव जोपासण्याचे काम करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

संघाचे तालुका कार्यवाह जगदीश धूत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष कार्यक्रमास डॉ निरज लांडे, डॉ. कृष्णा देहाडराय यांचेसह विविध स्तरातील मान्यवरांची उपस्थिती होती. हरीश शिंदे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले सेवानिवृत्त प्राचार्य संघाचे क्रियाशील कार्यकर्ते सुधीर आपटे यांनी आभार मानले.
