शेवगाव प्रतिनिधी, दि. १४ : तुरीचा हंगाम सुरू होऊन जवळपास दीड ते दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी शासनाने अद्याप कुठेही तुरीचे हमीभाव खरेदी केंद्र सुरु केलेले नाही. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीच्या विळख्यात सापडला आहे.

यासंदर्भात शेवगाव तालुक्यात शासकीय हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू करून तुर उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करणारे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व संबंधितांना दिले आहे. याबाबत येत्या आठवड्याभरात योग्य निर्णय झाला नाही तर तहसीलदार यांच्या दालनात तुरी ओतून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, यंदाच्या हंगामात शेवगाव तालुक्यात जवळपास पंधरा हजार हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड झाली असून शासनाने तुरीचा हमीभाव सात हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल जाहीर केला आहे. मात्र तालुक्यासह जिल्ह्यात कोठेही शासकीय तूर खरेदी हमीभाव केंद्र सुरू केलेले नसल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीच्या काळात खासगी व्यापाऱ्यांना आपली तुर विकण्याची वेळ आली आहे.

खासगी व्यावसायिक तुरीला सहा ते साडेसहा हजार प्रतिक्विंटल भाव देत असल्याने शेतकऱ्यांना क्विंटल मागे जवळपास एक हजार रुपये फटका बसतो. तुरीचा हंगाम अर्ध्यावर संपत आलेला आहे त्यामुळे हमीभाव तुर खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने देखील शासकीय तूर खरेदी हमीभाव केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच दाखल केला असून बाजार समितीलाही हमीभाव केंद्राची प्रतीक्षा आहे. याबाबत येत्या एक-दोन दिवसात परत पाठपुरावा करण्यात येणार आहे. – अविनाश म्हस्के, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती शेवगाव
