सुशीलामाई काळे महाविद्यालयाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवकांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, समाज सेवा आदी कर्तव्यांची तत्वमुल्ये रुजली जावून वेळप्रसंगी देशसेवेसाठी आपले सर्वस्व पणाला लावले पाहिजे याची शिकवण मिळते. आपले देश कृषी प्रधान देश असून शेतकरी हा राष्ट्राचा कणा आहे. त्यामुळे शेतकरी हिताकडे देखील लक्ष देणे गरजेचे असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरातून शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न देखील चर्चिले गेले पाहिजे असे मत प्राध्यापक कवी अमोल चिने यांनी व्यक्त केले.
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप नुकताच कोपरगाव तालुक्यातील मढी खु. येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक वसंतराव आभाळे होते.
यावेळी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना संचालक वसंतराव आभाळे म्हणाले की, मा.खा. कर्मवीर शंकररावजी काळे व त्यांच्या अर्धांगिनी माईसाहेब अर्थात सौ.सुशीलामाई काळे यांच्या अट्टाहासातून ग्रामीण भागातील मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशातून महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली त्यामुळे पंचक्रोशीतील विद्यार्थी व विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेवून विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहे. संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय गुणवत्तेच्या बाबतीत अव्वल असल्याचे त्यांनी सांगितले.
समारोप प्रसंगी संस्थेचे विश्वस्त सिकंदर चांद पटेल, प्राचार्या डॉ. विजया गुरसळ, मढी खु.चे सरपंच सुनील भागवत, उपसरपंच गायत्री गवळी, श्रीधर आभाळे, बीपीन गवळी, मुख्याध्यापक ए.बी. माळी आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल पोटे यांनी केले तर प्रा. भाऊसाहेब कांबळे यांनी आभार मानले. कु साक्षी सैंदर व कु निकिता शिंदे या स्वयंसेवक विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम अधिकारी प्रा.योगिता आजबे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.