कोपरगांव प्रतिनिधी, दि. १० : दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असुन कायदे व शिक्षा असुनही काहीं लोक होणाऱ्या परीणामांचा विचार न करता चुकीचा मार्ग निवडतात. यासाठी चांगले संस्कार, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सामाजीक एकता, सलोखा व बंधुता हा विचार आणि जाण शालेय जीवनातच होणे गरजेचे आहे. शिक्षण संस्काराबरोबरच सामाजिक संस्कार रूजवलेली पिढी उज्वल भारताचे भविष्य आहे, असे प्रतिपादन कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले यांनी केले.
संजीवनी अकॅडमीत स्कूलच्या संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांच्या संकल्पनेनुसार इयत्ता ८ वी ते ११ वीच्या विध्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्था बाबतची जागृती निर्माण व्हावी, या हेतुने आयोजीत केलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात देसले यांनी अतिशय मार्मिक पध्दतीने उदाहरणांसहित विध्यार्थ्यांशी संवाद साधला.
देसले पुढे म्हणाले की, वयाच्या १५ वर्षांपासून शारीरिक बदलांनुसार काहींमध्ये उन्मत्तपणाला उधान येते. यातुन भरधाव वेगाने वाहन चालविणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, आपआपसात किरकोळ कारणांवरून व गैरसमजातुन भांडणे करणे, मुलींची छेड काढणे, अशा गोष्टी उदयाला येतात. अनेकदा शालेय अथवा महाविद्यालयीन जीवनात विध्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होतात. यामुळे त्यांच्यात बुध्दीमत्ता असताना देखिल परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट अथवा सरकारी नोकरीसाठी चरित्र दाखला मिळत नाही.
सध्याची पिढीत चांगले टॅलेंट असुन स्वतः मधील क्षमता ओळखुन नवनवीन तंत्रज्ञान, कौशल्ये अवगत करून स्वतःला सिध्द करा. प्रत्येक आई वडील हे आपल्या पाल्याने शिकून मोठे व्हावे, हे स्वप्न उराशी बाळगत आपल्या पाल्यांच्या प्रगतीत धन्यता मानतात. मात्र एखादा पाल्य चुकीच्या मार्गाने जात असल्यास व पालकांना फसवत असेल तर अशा पालकांच्या स्वप्नांचा चक्काचुर तर होतोच, परंतु पाल्य स्वतःला फसवित आहे, हे विसरू नये.
प्रसंगी विद्यार्थ्यांशी निगडीत कोणत्या गुन्ह्याला काय शिक्षा मिळते, याची जाणिवही देसले यांनी दिली. अनेक अपयशातुन जे शिकायलास भेटते, ते जीवनातील कुठल्याच पुस्तकातुन शिकायला मिळत नाही. म्हणुन अपअशातुन खचुन न जाता ते पुढील विजयाचे मार्गदर्शन असते, असा सल्लाही देसले यांनी दिला. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी विध्यार्थ्यांकडून प्राप्त झालेले प्रश्न हे विध्यार्थी जिशन नजिर दारूवाला व आर्य योगेश भैरवकर यांच्या मार्फत विचारण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्राचार्या शैला झुंजारराव, उपप्राचार्य विलास बागडे, हेड मिस्ट्रेस रेखा साळुंखे, शिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते.