राज्य शासनाद्वारे शेतकऱ्यांना मिळणार युनिक आयडी – तहसीलदार सांगडे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र, राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ सर्व शेतकऱ्यांना सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळावा म्हणून नवीन युनिक आयडी – शेतकरी ओळख क्रमांक देण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सर्वत्र सुरु झाले आहे.  

शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा विपणन स्थानिक आणि  तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, यासाठी  विकसित केलेल्या ॲग्रिस्टॅक योजनेचा प्रारंभ राज्यभर करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून  शेवगाव तालुक्यातील १५ गावात तीचे काम जोरात सुरु असून एक मार्च अखेर तालुक्यातील संपूर्ण ११३ गावात  त्याची अंमलबजावणी पूर्ण होणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे, नायब तहसीलदार गौरी कट्टे यांनी  दिली.

शासनाच्या या महत्त्वकांक्षी योजने अंतर्गत शेतकऱ्यांचा ७/१२ व ८ अ उतारा लिंक करून त्यांना एक नविन युनिक आय डी – शेतकरी ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यावर पीएम किसान योजनेचे लाभ, पीककर्ज विमा, तसेच आपत्ती व्यवस्थपन अंतर्गत शेतकऱ्यांची देय नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षणात सुलभता यावी यासाठी तसेच किमान आधार भूत किंमतीत धान्य खरेदीसाठी, कृषी विषयक सल्ले,  निविष्ठा व इतर सेवा देणाऱ्या यंत्रणाचा शेतकऱ्यांना लाभ मिळणे सुलभ होणार आसल्याची माहिती नायब तहसीलदार कट्टे यांनी दिली.

तालुक्यातील शेवगाव वडुले खुर्द, आखतवाडे, कांबी, अमरापूर, मुर्शदपूर, गायकवाड जळगाव, घेवरी, आंतरवली खुर्द, विजयपूर, प्रभूवाडगाव, मंगरूळ खुर्द, हातगाव व शेकटे आदि १५ गावात तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्य यांच्य्या मार्फत हे काम सध्या होत असून शेतकरी स्वतः देखील त्यासाठी आपल्या नजीकच्या सरकार सेवा केंद्रात सुद्धा नोंदणी करू शकतात.

तालुकास्थरावर उपविभागीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली  गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, निमंत्रित सदस्य यांची समिती गठित असून तहसीलदार सचिव म्हणून कामकाज पहात आहेत. 

Leave a Reply