शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : सार्वजनिक बांधकाम खात्याने शेवगावातील सर्वच रस्त्यावरील टपरीधारकांना नोटीसा दिल्याने सर्व टपरीधारकांनी दुकाने बंद ठेवली. सर्व पक्षीय कार्यकर्ते व टपरीधारकांनी एकत्र येऊन तहसीलदारांना शेवगाव शहरालगत बाहय वळण रस्ता तातडीने मंजुर करण्याची मागणी केली.

निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव शहर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याची जोडणारे विकसनशील शहर आहे. शेवगाव शहरालगत असणाऱ्या ऑइल मिल, जिनिंग व इतर छोटे मोठे उद्योग यामुळे सातत्याने शहरातील मुख्य रस्त्यावरून नेहमी वाहनांची वर्दळ चालू राहते. त्याचबरोबर मेडिकल कॉलेज, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय व महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची सातत्याने दिवसभर चालू राहते.

शेवगाव शहराच्या चारही दिशेने असणाऱ्या साखर कारखान्यामुळे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक, ट्रॅक्टर ट्रॉली यांच्या रहदारीसाठी गावातीलच मुख्य रस्ता वापरात येतो. नेवासा, पाथर्डी, गेवराई, पैठण या तालुक्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती झाल्याने वाहनांची वर्दळ रात्र दिवस शहरातून चालू असते. म्हणून शहरालगत बाहयवळण रस्ता तातडीने मंजूर करुन रस्त्याचे काम त्वरीत मार्गी लावावे. तसेच शहरातील टपरी धारकांचे पुनर्वसन करावे या मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रशांत सांगडे व पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना देण्यात आले.

शहराची लोकसंखका मोठी असून येथील, क्रांती चौक, गांधी चौक, पैठण रोड आदी ठिकाणी सततच्या वाहतुक कोंडीमुळे नागरिकांची दमच्छाक होते. वाहतुक कोंडीमुळे झालेल्या अपघातात अनेकांनी प्राण गमावले आहेत. या सर्व महत्वपूर्ण बाबींचा विचार करुन मागे कबूल केल्यानुसार शहराबाहेरुन बाहयवळण रस्त्या चे काम त्वरीत सुरु करावे. याबाबत गांभीर्यपूर्वक विचार करुन भविष्यात होणारी वित्त व जीवित हानी टाळावी.

नोटीसमुळे सर्व जण धास्तावलेले आहेत. शहरातील सर्व बाजारपेठ ही सर्व रस्त्यावर आहे. शहरातील अतिक्रमणावर हातोडा पडल्यास गोरगरीब टपरीधारकांवर उपासमारीची वेळ येईल. बेरोजगारी वाढेल मुला बाळांचा शेक्षणीक व वैवाहिक प्रश्न निर्माण होईल. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, केंद्रीय रस्ते व बांधकाम मंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, उपअभियंता, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी आदींना पाठवण्यात आल्या आहेत.

दरम्यान निवेदन कर्ते आणि आंदोलकांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई वरच्या पातळीवरून होत असल्याने व संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात ती टप्प्या टप्प्याने सुरु असल्याने यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप चालणार नसल्याचे सांगून सहकार्य करण्याचे व स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले आहे. येत्या काही दिवसतात कुठलीही पूर्वसूचना न देता कारवाई होणार असल्याची माहिती दिली. त्यावर सायंकाळ पासून अधिक नुकसान नको म्हणून अनेकांनी आपण होऊन ती काढण्यास सुखान केली आहे.
