कोपरगावमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडली
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : कोपरगाव शहराचे विद्रुपीकरण करीत ज्याला जिथे हवे तिथे फ्लेक्स लावण्याची स्पर्धा सुरु झाली. अखेर फ्लेक्सची विटंबना झाली म्हणून गाव बंद करून कोपरगावची कायदा सुव्यवस्था बिघडली. गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या मुख्य रस्त्यावर तसेच मोक्याच्या ठिकाणी विविध प्रकारचे भलेमोठे फ्लेक्स लावण्याची चढाओढ सुरु झाली. शहरातील अनेक महापुरुषांच्या स्मारकाजवळ फ्लेक्स लावून स्वत:चं उदोउदो करण्याच्या नादात खुद्द महापुरुषांच्या स्मारकांना झाकले जाते.

कोणी कोणताही मजकूर टाकुन फ्लेक्स लावतात. त्याला ना पालीकेची, ना पोलीसांची परवानगी. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. अगदी गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक चौकाचौकात स्थानिक दुकानदारांच्या दुकानासमोर बोर्ड लावुन दुकानदारांवर अन्याय करतात. उलट त्याच दुकानदाराकडून विविध प्रकारच्या कार्यक्रमाच्या पावत्या फाडून वर्गणी वसुल केली जाते. कोणाचा फ्लेक्स कुठे लागला पाहीजे यावरून रस्सीखेच सुरु असते.

काही महिन्यांपूर्वी एका कार्यकर्त्याचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा फ्लेक्स कोणीतरी फाडला त्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. अखेर अंतर्गत समेट घडवून वाद मिटला, पण कुरबुर सुरुच आहे. पाठीमागे दहीहंडीच्या फ्लेक्स वरून दोन गटात वादविवाद झाला, अखेर पोलीसांनी मध्यस्थी करुन वादाला पुर्णविराम दिला. तरीही दहीहंडी उत्सव आला की, कुरबुरी वाढतात.

नुकतेच माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा फलकाची विटंबना झाली आणि समाजबांधवांच्या भावना दुखावल्या म्हणून गाव बंद करण्यात आले, रास्ता रोको झाला. संपुर्ण गावाची चिंता वाढली. वारंवार जर फ्लेक्स लावण्यावरून शहराची कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तरीही पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेतय.

पालीका प्रशासन नाममात्र पावती फाडून डोळ्याला पट्टी बांधणार असले तर जसे पुर्वी केबल वार होवून जाळपोळ, दंगलसदृश स्थिती निर्माण झाली. तशी पुन्हा फ्लेक्स लावण्यावरुन होण्याची काहीजन वाट पहात आहेत का? कोणतीही परवानगी न घेता फ्लेक्स का लावले जातात. कोणाच्या आशीर्वादाने फ्लेक्स लावले जातात शहराच्या बहुतांश भागात सर्व प्रकारच्या फ्लेक्सने परिसर झाकून टाकला जातोय.

रस्त्यावर लावलेल्या फ्लेक्समुळे वाहने चालवणाऱ्यांचे लक्ष विचलीत होवून छोटेमोठे अपघात घडतात. रहदारीला अडथळा होतो. शहराचे विद्रुपीकरण होते. फ्लेक्स लावण्यासाठी शासनाने जी नियमावली ठरवून दिली आहे त्याचे कोणतेही पालन केले जात नाही. यावरून कोपरगाव शहराच्या उध्वस्त बाजारपेठेला पुन्हा सुरुंग लावण्याचे काम फ्लेक्स बहादुर करीत आहेत. पालीका प्रशासन व पोलीस यापुढे दक्षता घेवून विनापरवाना फ्लेक्स लावणाऱ्या वर कठोर कारवाई करणार का?

फ्लेक्स लावून नेत्यांच्या पुढे रुबाब गाजवणाऱ्यानां निर्बंध लागतील का? शहराच्या चौका चौकातील फ्लेक्सवर मर्यादा असणार का? जो पर्यंत पालीकेची व पोलीसांची परवानगी नाही तो पर्यंत खाजगी किंवा शासकीय जागेत फ्लेक्स लावण्यास बंदी घालतील का? अशा अनेक प्रश्नांच्या मालीका कोपरगाव करांच्या मनात घोळत आहे. शहराची शांतता अबाधित ठेवण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करणे काळाची गरज आहे.
