शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : कृषिप्रधान भारतातील शेती आणि शेती पूरक क्षेत्राला उभारी देण्याच्या उद्देशाने सहकार मंत्रालयाने स्थापित केलेल्या एनसीडीसी या वित्तीय संस्थेद्वारे तसेच आर्थिक क्षेत्रात देशात अग्रस्थानी असलेल्या श्रीरेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट संस्थेच्या माध्यमातून येत्या शुक्रुवार दिनांक २१ ला श्री क्षेत्र अमरापूर येथील श्री रेणुका माता देवस्थानात पंचक्रोशीतील निवडक अंदाजे सव्वासे युवा शेतकऱ्यांचे एकदिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती -श्री रेणुका माता मल्टीस्टेट संस्थेचे संस्थापक तथा ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत नाना भालेराव यांनी दिली.

यावेळी डॉ. भालेराव यांनी एनसीडीसी या वित्तीय संस्थेमार्फत उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती येथील युवा शेतकऱ्यांना व शेती पूरक व्यावसायिकांना व्हावी जेणेकरून त्यांना आपल्या व्यवसायात प्रगती साधता येईल. या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून एनसीडीसी संदर्भात अधिक माहिती दिली ते म्हणाले,
पतसंस्था, औद्योगिक आणि सेवा सहकारी संस्थांना प्रोत्साहन म्हणून एनसीडीसी सहकारी संस्थांना आर्थिक मदत करते.

सहकारी संस्थाना किमान कागदपत्रावर प्रारंभीच्या वर्षात बिनव्याजी तर पुढे माफक व्याजदराने खेळते भांडवल कर्ज म्हणून दिले जाते. महाराष्ट्रात, आर्थिक मदतीसाठी साखर कारखान्यांवर लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी संस्थेने १० हजार कोटी विशेष राखीव ठेवले असून कारखान्याच्या आधुनिकीकरण आणि विस्तार, सहनिर्मिती आणि इथेनॉल उत्पादन आणि स्थापनेसाठी कर्ज वितरित केले जाते.

एनसीडीसीने अलीकडेच सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे पीएम फॉर्मलायझेशन स्कीम (पीएमएफएमई स्कीम) सुरू केली. त्या अंतर्गत पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५% आर्थिक सहाय्याने कृषी प्रक्रिया उपक्रमांमध्ये गुंतलेल्या सहकारी संस्थांसाठी कर्जावरील अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. ब्रँडिंग आणि मार्केटिंगमध्ये ५०% पर्यंत मदत देखील आहे.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेद्वारे मत्स्यपालनासाठी नव्याने अंमलात आणलेल्या ऑपरेटिंग खर्चासाठी (४०% ते ६०% पर्यंत अनुदान) योजनांचा लाभ सहकारी संस्था घेऊ शकते. मधमाशी पालनासाठी ७५% अनुदान दिले जाते. सहकारी क्षेत्रातील तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, नव्याने स्थापन झालेल्या सहकारी संस्था त्यांच्या युवा सहकार योजनेअंतर्गत पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी आणि तसेच रुग्णालयांनाही या योजनेला लाभ घेता येतो.

या परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तसेच शेतीपूरक व्यवसायिकांना या योजनांचा लाभ मिळावा, परिसराचा विकास व्हावा, या उद्देशाने सुरुवातीच्या काळात निवडक सत्वाशे शेतकरी व शेतीपूरक व्यवसायिकांची निवड करण्यात येणार आहे असे डॉ. भालेराव म्हणाले.

यावेळी एनसीडीसीचे रिजनल डायरेक्टर कर्नल विनीत नारायण, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, प्रान्ताधिकारी प्रसाद मते, शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे, पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक, सुरभी हॉस्पिटलचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध देवचक्के, ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी प्रवेशासाठी नोंदणी आवश्यक असून श्री रेणुका माता रेणुका माता मल्टी स्टेट्स संस्थेच्या शेवगाव पाथर्डी पंचक्रोशीतील शाखांशी संपर्क साधावा. ऐनवेळी येणाऱ्यांना प्रवेश मिळणार नाही. असे आवाहन संयोजकांनी केले आहे. दिवसभराच्या शिबिरकाळात श्री रेणुका माता देवस्थानच्या वतीने सर्व शिबिरार्थींची भक्त निवासात भोजन, चहापान व सभागृहाची सुविधा करण्यात आली आहे.
