कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : राजकीय जीवनात नेतृत्वाचा विश्वास मिळविणे आणि सार्थ ठरविणे याला अनन्यसाधारण महत्व आहे. मला नेतृत्वाचा विश्वासही मिळविता आला व कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपसभापती म्हणून काम करीत असतांना मला कोपरगाव मतदार संघाचे भाग्यविधाते माझे नेते आ.आशुतोष काळे यांचा विश्वासही सार्थ ठरवता आला याचा विशेष आनंद आहे. परंतु त्याचबरोबर नेत्याने देखील सामंजस्यपनाची भूमिका घेऊन दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदाचा राजीनामा दिला असल्याचे विद्यमान उपसभापती गोवर्धन परजणे यांनी म्हटले आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदाचा रोटेशन नुसार अडीच वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच विद्यमान उपसभापती यांनी आपल्या पदाचा राजीनामा सभापती साहेबराव रोहोम यांच्याकडे सुपूर्द केला. त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतांना त्यांनी सांगितले की, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर आ.आशुतोष काळे यांनी मला बाजार समितीच्या उपसभापती पदाची जबाबदारी दिली. जबाबदारी तशी मोठी होती परंतु सहकारी संचालकांच्या सहकार्यातून ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला.

मला जबाबदारी देताना ही जबाबदारी अडीच वर्षासाठी आहे याची मला कल्पना असल्यामुळे अडीच वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे, कारण नेत्याने दिलेला शब्द पण पूर्ण होणे तेवढेच गरजेचे आहे. यापुढील काळातही आ.आशुतोष काळे यांनी दिलेली कोणतीही जबाबदारी समर्थपणे पार पाडणार असल्याचे उपसभापती गोवर्धन परजणे यांनी सांगितले आहे. यावेळी संचालक संजय शिंदे, शिवाजीराव देवकर, रामदास केकाण, ऋषिकेश सांगळे उपस्थित होते.

सहकारी संस्थेत राजकारण नको या उद्देशातून मागील पंचवार्षिक मध्ये कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक बिनविरोध झाली होती. त्यावेळी काळे गटाचे मधुकर टेके यांना प्रथम अडीच वर्षासाठी सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे अडीच वर्ष पूर्ण होण्याच्या एक महिना अगोदर आ.आशुतोष काळे यांच्या आदेशाने पुढील सभापतीला पूर्ण अडीच वर्षाचा कार्यकाळ मिळावा यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्याच प्रमाणे पुढील निवडीसाठी माझी अडचण होवू नये यासाठी माझे नेते आ.आशुतोष काळे यांच्या आदेशाने मी राजीनामा देत आहे. – गोवर्धन परजणे


