कर्मवीर काळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कृषी महोत्सव व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : शाश्वत शेती, कार्यक्षम सिंचन आणि ग्रामीण शिक्षणाद्वारे शेतकऱ्याचा विकास साधणे या कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या विचाराची प्रेरणा घेवून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील गौतम पब्लिक स्कूलच्या विशाल मैदानावर मा.खा.स्व.कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १३ व्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधत भव्य ‘कर्मवीर कृषी महोत्सव’ व ‘भव्य शेतकरी मेळावा’ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कर्मवीर शंकररावजी काळे यांनी आयुष्यभर ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाचे कार्य केले. त्यांनी शिक्षण, शेती, सहकार आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवून समाजाला दिशा दिली. त्यांच्या १३ व्या पुण्यस्मरणानिमित्त ‘कर्मवीर कृषी महोत्सव’ आयोजित करण्यामागे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान अवगत व्हावे व त्याचा फायदा शेती उत्पन्न वाढविण्यासाठी व्हावा हा या कर्मवीर कृषी महोत्सवाचा उद्देश आहे.

या कर्मवीर कृषी महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार (दि.०७) रोजी सकाळी ११.०० वा.राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तसेच या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात राज्याचे कृषी मंत्री ना.दत्तामामा भरणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.

 शुक्रवार (दि.०७) ते रविवार (दि.०९) पर्यंत तीन दिवस चालणाऱ्या या कर्मवीर कृषी महोत्सवामध्ये शुक्रवार रोजी सकाळी ११ ते ०५ या वेळेत श्री साईबाबा  हॉस्पिटल शिर्डी यांच्या सहकार्यातून तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार (दि.०८) रोजी सकाळी ११.०० वा. पूर्व हंगामी व सुरु ऊस व्यवस्थापन या विषयावर एम.डी. गन्ना मास्टर अॅग्रो इंडस्ट्रीज सांगली येथील डॉ.अंकुश चोरमुले शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करणार आहे. रविवार (दि.०९) रोजी सकाळी ११.०० वा. किफायतशीर दुग्ध व्यवस्थापन या विषयावर बारामती येथील डॉ.शैलेश मदने शेतकरी व दुग्ध व्यवसायिकांना मार्गदर्शन करणार आहे.

हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी एक मार्गदर्शकाची भूमिका बजावणार असून आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी औजारे,  कृषी निविष्ठा, आधुनिक सिंचन पद्धती अशा अनेक विषयावर शेती तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या प्रदर्शनात कृषी साहित्य, उपकरणे आणि आधुनिक शेती पद्धती बाबत शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी अचूक मार्गदर्शन मिळणार आहे. शुक्रवार पासून सुरु होणाऱ्या या तीन दिवसीय भव्य कर्मवीर कृषी महोत्सवाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

Leave a Reply