कोपरगावमध्ये अपक्षांच्या बळावर मतांची खेचाखेची    

 नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपक्षांकडे सर्वांचे लक्ष

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : कोपरगाव नगरपालीकेच्या सार्वञिक निवडणुकीत पहील्यांदाच एकाचवेळी चार पक्षाचे उमेदवार मोठ्या ताकतीने एकमेकांच्या विरोधात उतरले आहेत. नेहमी काळे विरूद्ध कोल्हे अशीच सरळ लढत होत होती. गेल्या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी अपक्ष उमेदवारी करुन विक्रमी विजय मिळवत कोपरगावमध्ये इतिहास रचला त्यामुळे पुन्हा अपक्ष अथवा काळे-कोल्हे यांच्या उमेदवारांना ढावलुन आपलीच लाॅटरी लागेल या अपेक्षेने अनेकजन नगराध्यक्ष पदाचे स्वप्न रंगवत आहेत. या निवडणुकीत  कोल्हे गट तथा भाजप मिञ पक्षाकडून पराग संधान निवडणुकीच्या रिंगणात दुसऱ्यांदा उतरले आहेत.

मागच्यावेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मोठ्या ताकतीने संधान रिंगणात उतरले आहेत त्यांनी प्रचारामध्ये गती घेवून मतदारांपर्यंत पोहचत कोपरगावच्या विकासाचा आराखडा सांगत आहेत. तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अर्थात काळे गटाकडून उभे असलेले राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी आपली संपूर्ण यंञणा प्रचार यंञणेत कामाला लावून मतदारांच्या घराघरा पर्यंत आपल्या विकासाचे नवे स्वप्न सांगत आहेत. त्यांच्या गुलाबी गाडीने कोपरगावचे दक्ष वेधले आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या सहकार्याने ते मतदारांच्या मनात आपली वेगळी प्रतिमा निर्माण करीत आहेत. कोयटे व संधान यांनी काळे-कोल्हेंच्या मदतीने व स्वताच्या बळावर जरी प्रचारात आघाडी घेतली तरीही दोघांना भिती आहे ती  दोन सेनेच्या उमेदवारांसह अपक्षांची.

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करीत शिंदेच्या सेनेच्या आधारावर दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरले आहेत. यापुर्वी ते प्रथम जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यामुळे यावेळीही त्यांना कोपरगावची जनता नगराध्यक्षपदी विराजमान करेल या हेतूने तसेच विकासाचा नवा फंडा जनतेला सांगुन मतदारांना आपलसं करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. माञ कोपरगावमध्ये यावेळी काळे-कोल्हेंनी मोठी ताकत लावल्यामुळे झावरे कशी बाजी मारतात आणि कोणाच्या बाजूचे मते खेचुन घेतात याकडे लक्ष लागले आहे.

भरत मोरे यांच्या पत्नी व माजी नगरसेविका सपना मोरे यांना उबाठा सेनेकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाल्याने भरत मोरे यांच्या एकतर्फी संघर्षाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न्याय दिला असावा म्हणून त्यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली, पण मोरे पतीपत्नी जनतेच्या मनात आपला संघर्ष उतरवणार की, शिवसेनेच्या बळावर मते खेचतात याकडे लक्ष लागले आहे. भरत मोरे हे शिवसेनेतील अंतर्गत वाद मिटवून सर्व काही एकवटून आणतात याकडे लक्ष अधिक आहे. 

दरम्यान मागच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून अपक्ष नगराध्यक्ष झालेले विजय वहाडणे हे कायम आपल्या बोलण्यात मी भाजपचा निष्ठावंत आहे. आमच्या निष्ठावंतासाठी माझी लढाई असते असे म्हणत गेल्यावेळी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला यावेळीही भाजपचे पराग संधान यांच्याच विरोधात ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. पण त्यांचा करिष्मा यावेळी किती चालतो याकडे लक्ष लागले आहे.

पण या निवडणुकीत सर्वांत लक्षवेधी ठरत आहेत ते अपक्ष निवडणूक लढवणारे दिपक वाजे. वाजे यांनी सुरुवातीपासून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा चंग बांधला होता. कोल्हे यांचे ते कट्टर कार्यकर्ते असल्यामुळे त्यांच्या निवडणुकीचा फटका सर्वाधिक कोल्हेंना बसणार अशी चर्चा सुरु आहे. माञ या निवडणुकीत वाजे यांच्या कार्यकर्त्यांचा जोश जोरात आहे, त्यामुळे वाजे किती मतांनी अग्रभागी राहतील किंवा ते कोणाला लाभदायक व तापदायक ठरतील हे निकालावरून स्पष्ट होईल. 

 तसेच भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते योगेश वाणी यांचा जनसंपर्क चांगला असल्यामुळे ते किती कुणाचे मते खेचतील हे पहवा लागेल इतर काही अपक्ष उमेदवार आपला चमत्कार कसा दाखवतात यावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे. कोणता अपक्ष उमेदवार किती कोणाचे मत खेचतो यावर कोपरगावचा नगराध्यक्ष निश्चित होणार यात कोणतीही शंका नाही. यावेळी कोपरगावची जनता कोणाच्या बाजून झुकते अथवा जनतेला कोणता उमेदवार आपलंस करून घेते यावर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मताधिक्य मिळू शकणार आहे. 

Leave a Reply