दलित वस्ती सुधार कामांच्या माहितीसाठी आंदोलन

शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : तालुक्यातील वडुले खुर्द मधील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेल्या विविध कामांची  माहिती देण्यास टाळाटाळ करुन दिलेली माहिती देखील चुकीची दिल्याच्या कारणावरून येथील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय लहासे यांचे नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

      दलित वस्ती सुधारणेसाठी वडुले खुर्द  गावासाठी आजवर किती निधी आला व तो कसा खर्च झाला. याची मागणी या आंदोलनात करण्यात आली. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने वारंवार मागणी .करूनही माहिती न देणे, त्याच बरोबर दिशाभूल करणारी माहिती देणे, असा प्रकार पंचायत समितीच्या वतीने करण्यात आला. त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन पंचायत समिती आवारात करण्यात आले.

      त्यानंतर पंचायत समिती प्रशासन जागे होवून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन २०२० ते २०२२ या काळातील खर्चित अखर्चित अहवाल पंचायत समितीच्या  सहाय्यक गटविकास अधिकारी दिप्ती गाठ यांनी पूर्ण माहिती दिल्यानंतरच आंदोलन आटोपते घेण्यात आले.    

      यावेळी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष तान्हाजी मोहिते, गोसावी समाज अध्यक्ष दत्तात्रय अनंतपुरी, आशितोष लहासे, अशुमन  बळीद, सिद्धार्थ मगर, सिद्धार्थ निकाळजे, अनिरुद्ध गरुड आदींसह नागरिक उपस्थित होते.