समताला अडचणीत आणण्याचा विरोधकांचा डाव उधळला – काका कोयटे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : समता पतसंस्थेची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने काही विरोधकांनी थकबाकीदारांच्या माध्यमातून दाखल केलेल्या समता पतसंस्थेची चौकशी सहकार मंत्रालयाने अखेर थांबविली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल माहिती व कायदेशीर बाबींचा अभ्यास केल्यानंतर सहकार मंत्रालयाकडून ही चौकशी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सत्याचाच विजय झाला असून समता पतसंस्थेला अडचणीत आणण्याचा डाव उधळला असल्याचे मत समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, विरोधकांच्या पाठबळावर थकबाकीदारांनी संस्थेविरोधात चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या तक्रारी दाखल केल्याचा आरोप केला आहे. या अगोदर देखील याच थकबाकीदारांनी संस्थे विरोधात सहकार खात्याकडे अर्ज दाखल करून ही संस्थेला क्लीन चीट दिलेले आहे. त्या चौकशीत संस्थेविरोधात काहीही निष्पन्न झालेले नव्हते. तसेच याच थकबाकीदारांनी हायकोर्ट, जिल्हा कोर्टात देखील संस्थेविरोधात याचिका दाखल केल्या होत्या. परंतु चुकीच्या याचिका दाखल केल्या असता हायकोर्टानेच त्या याचिका फेटाळून त्या थकबाकीदारांना ५० हजारापर्यंत दंड ठोठावलेला आहे.

समता पतसंस्थेच्या वतीने ॲड. विजय गवांदे यांनी बाजू मांडली. ते म्हणाले की, समता पतसंस्थेची वसुली कठोर व कायदेशीर करण्यात येत असते. सहकार मंत्रालयात याचिका दाखल केलेल्या थकबाकीदारांची वसुली देखील कायदेशीर करण्यात आली आहे. सहकार मंत्रालयात याचिका दाखल केलेल्या थकबाकीदारांच्या मालमत्तेची किंमत ठरवून त्यांच्या समक्ष विक्री करण्यात आली होती. ठरलेल्या किमतीपेक्षा अधिक किमतीने त्यांच्या जप्त केलेली मालमत्ता विकण्यात आली नसून थकबाकीदारांची कोणतीही फसवणूक झाली नाही. 

याउलट काका कोयटे कोपरगाव नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी कोपरगाव सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी निवडणूक रिंगणात असल्यामुळे त्यांची बदनामी विरोधकांनी त्या थकबाकीदारांना एकत्र आणून चालू केली आहे. विरोधकांकडून सहकार आयुक्त कार्यालयावर दबाव आणून ही चौकशी लावण्यात आली आणि संस्थेच्या चौकशीचे आदेश दिले होते. परंतु विरोधकांनी काका कोयटे यांना विरोध करण्यासाठी थकबाकीदारांच्या माध्यमातून संस्थेची चौकशी लावली असून त्या थकबाकीदारांची देखील चौकशी करण्यात यावी.

तसेच समता पतसंस्था ही गेल्या अनेक वर्षांपासून सहकार खात्याने घालून दिलेल्या निकषाप्रमाणे सभासद व ग्राहकांच्या विश्वासावर पारदर्शक, शिस्तबद्ध आणि नियमबद्ध पद्धतीने कार्यरत असून संस्थेच्या आर्थिक व्यवहारात कोणतीही अनियमितता नसल्याचे यापूर्वीही प्रत्येक वर्षी होणाऱ्या ऑडिटमध्ये अ दर्जा मिळून स्पष्ट झाले आहे. मात्र, कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये संस्थेचे चेअरमन काका कोयटे कोपरगाव नगरपालिका नगराध्यक्षपदाची उमेदवारी करत असल्यामुळे विरोधकांचा थकबाकीदारांच्या माध्यमातून संस्थेचा अपप्रचार व अफवा, सोशल मीडियावर बदनामी करण्याचा डाव चालु असल्याची माहिती संस्थेचे व्हा.चेअरमन अरविंद पटेल यांनी दिली.

याबाबत जेष्ठ संचालक जितूभाई शहा म्हणाले की, विरोधकांनी संजय चंद्रकांत मोरे, वसंत मधुकर घोडके, ओमप्रकाश बाबूआप्पा खके या थकबाकीदारांना एकत्र करून सहकार मंत्रालयात चौकशीची याचिका दाखल केली होती. सहकार मंत्रालयात थकबाकीदारांनी केलेल्या चौकशी अर्जाची प्रत संस्थेला ८ डिसेंबर २०२५ रोजी संस्थेला प्राप्त झाली. त्याच दिवशी समता पतसंस्थेचे म्हणणे ऐकून न घेता विरोधकांच्या दडपणाखाली हा आदेश सहकार मंत्रालयाने दिला.

त्यानंतर संस्थेच्या वतीने १० डिसेंबर २०२५ रोजी थकबाकीदारांच्या विरोधात सहकार मंत्रालयात याचिका दाखल केली. प्रसंगी ज्यांनी सहकार मंत्रालयाकडे चौकशीची याचिका दाखल केली होती ते थकबाकीदार संजय चंद्रकांत मोरे, वसंत मधुकर घोडके, ओमप्रकाश बाबूआप्पा खके सुनावणी दरम्यान सहकार मंत्रालयात उपस्थित होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या समक्ष सहकार मंत्रालयात झालेल्या सुनावणीत समता पतसंस्थेची चौकशी थांबविली आहे.

निवडणूक काळात थकबाकीदारांच्या तक्रारीवरून सहकार खात्याकडून लावण्यात आलेल्या चौकशीमागे तथ्य नसल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने सदर चौकशी थांबविण्यात आली आहे.आम्ही देखील थकीत कर्जदारांनी संस्थेची केलेल्या बदनामी विरोधात न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी सांगितले. या निर्णयामुळे समता पतसंस्थेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त झाल्याची भावना सभासद व ग्राहकांमध्ये व्यक्त होत आहे.

समता पतसंस्थेने भविष्यातही कायदेशीर चौकटीत राहूनच कार्य सुरू ठेवणार असून कोणत्याही प्रकारच्या दबावाला किंवा अफवांना बळी न पडता सभासदांच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply