कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील मतदान केंद्र चार परजने लॉ कॉलेज येथे रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या. मतदान करताना मतदारांचा गोंधळ उडत असल्याने मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू होती. आमदार आशुतोष काळे स्वतः तळ ठोकून होते. सर्वपक्षीय उमेदवारांनी देखील प्रशासनाला साथ दिली. या मतदान केंद्रावर 1052 मतदार होते त्यापैकी 752 मतदान झाले. शेवटचे मतदान भाजपाचे विनोद राक्षे यांचे 7 वाजून 50 मिनिटांनी झाले.

प्रभाग 15 मधील मतदान केंद्र क्रमांक चार वर संध्याकाळी पाच नंतर मोठी गर्दी झाली होती. मात्र ही गर्दी नेमकी कशाने झाली याचा आढावा घेतला असता मतदारांना तीन मते करावयाची होती, मात्र ईव्हीएम मशीन वर मतदान कसे करावे यावरून या भागातील अनेक मतदारांचा ज्येष्ठांचा महिलांचा गोंधळ उडालेला दिसून आला. त्यामुळे या मतदान केंद्रावर संथ गतीने मत प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

अखेर आमदार आशुतोष काळे यांनी स्वतः उपस्थित राहून प्रशासनाला ईव्हीएम मशीन आधी टेबलवर डमी मतपत्रिका ठेवून त्यावरून मतदारांना प्रबोधन करावे अशा सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह निवडणूक व प्रशासकीय अधिकारी या मतदान केंद्रावर रात्रीपर्यंत उपस्थित होते. या केंद्रावर ईव्हीएम मध्ये काहीतरी बिघाड झाल्या असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र मतदारांचा मतदान करताना उडालेला गोंधळ यामुळे मत प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचे लक्षात आले.


