शेवगाव प्रतिनिधी, दि. १५ : शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अंतर्गत एकत्रित येऊन गटा मार्फत अथवा वैयक्तिकरीत्या शेती निगडित जोड व्यवसाय करावा तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक फळबाग लागवड, गांडूळ खत युनिट, नाडेप खत युनिट अशा योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. त्यातून समाधानकारक रोजगार उपलब्ध होईल असे प्रतिपादन उपािभागीय कृषी अधिकारी विलासराव नलगे यांनी येथे केले.
तालुक्यातील विजयपूर येथे ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ मोहीम योजने अंतर्गत आयोजित महिला व शेतकरी मेळाव्यात उपविभागीय कृषी अधिकारी नलगे मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी विजयपूरचे सरपंच विठ्ठल जगदाळे, माजी सरपंच काकासाहेब काळे, दीपक जगदाळे, श्रीकांत काळे, भाऊ काळे, संजय काळे, तसेच माहिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
नलगे यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची इ के वाय सी करणे बाकी असेल त्यांनी प्रथम प्राधान्याने आपल्या नजीकच्या सेतू कार्यालयात जाऊन ते पूर्ण करण्याच्या सुचना केल्या.
कृषी पर्यवेक्षक बाळकृष्ण विघ्ने यांनी महा डीबीटी अंतर्गत यांत्रिकीकरण ठिबक सिंचन फलोत्पादन , कांदा चाळ, शेडनेट पॉलिहाऊस बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले . तर कृषी सहायिका श्रीमती मनीषा पवार यांनी परसबाग भाजीपाला लागवड व त्याचे आहारातील महत्त्व याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित महिलांना परसबागेतील भाजीपाला किटचे वाटप करण्यात आले. कृषी सहाय्यक अनंत रणमले यांनी सुत्रसंचालन केले. तर काकासाहेब काळे यांनी आभार मानले.