कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेतून निवडून आलेल्या आ.आशुतोष काळे गटाच्या बक्तरपूर, बहादरपूर, डाऊच बु.च्या सरपंच पदाबरोबरच या ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदही काळे गटाकडे आले असून करंजीचे उपसरपंचपद देखील काळे गटाने ओढून आणले आहे.
२७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेतून निवडून आलेले सर्वाधिक १६ सरपंच आ. आशुतोष काळे गटाचे आहेत. या सर्व ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांची निवडणूक प्रक्रिया २९,३०,३१ डिसेंबर रोजी तीन टप्यात होत असून गुरुवार (दि.२९) झालेल्या १२ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांपैकी सर्वाधिक ८ उपसरपंच आ.आशुतोष काळे गटाचे निवडून आले आहेत. दुसऱ्या टप्यात देखील पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत बक्तरपूर, बहादरपूर, डाऊच बु. व करंजीचे उपसरपंचपद आ.आशुतोष काळे गटाकडे आले आहे.
यामध्ये बक्तरपूरच्या उपसरपंचपदी सौ.कमलाबाई काशिनाथ सानप, बहादरपूरच्या उपसरपंचपदी रामनाथ रखमा पाडेकर, डाऊच बु. उपसरपंचपदी भिवराज मार्तंड दहे यांची निवड झाली असून करंजीच्या उपसरपंचपदी शिवाजी कारभारी जाधव यांची निवड झाली आहे. याबरोबरच आ.आशुतोष काळे गटाकडे २७ ग्रामपंचायतीच्या पार पडलेल्या निवडणुकीत १६ सरपंच व आजपर्यंत १२ उपसरपंच झाले असून (दि.३१) रोजी होणाऱ्या अंतिम उपसरपंचाच्या निवडीतून हि संख्या आणखी वाढणार आहे.
सर्व नवनिर्वाचित उपसरपंचांचे माजी आमदार अशोकराव काळे, आ. आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. उपसरपंचपदाची संधी दिल्याबद्दल निवड झालेल्या सर्व उपसरपंचांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. मिळालेल्या संधीतून गावाच्या विकासाला प्राधान्य देवू. सर्वाना सोबत घेवून आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासाचे मुलभूत प्रश्न मार्गी लावून गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे सांगितले.