कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : स्थानिक के.जे.सोमय्या (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख डॉ. गणेश चव्हाण यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळावर निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली आहे.
डॉ. गणेश चव्हाण हे मागील १६ वर्षापासून भूगोल विभागात कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ६ विद्यार्थी पी.एचडी चे शोधकार्य पूर्ण करत आहे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासामध्ये तसेच नव-नवीन कोर्सेस सूरू करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. ते मागील अनेक वर्षापासून महाविद्यालयातील अकडेमिक व रिसर्च विभागाचे समन्वयक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या संघाची अविष्कार : २०२२ स्पर्धेत राज्य पातळीवर निवड झाली आहे.
डॉ. चव्हाण यांचे आत्तापर्यंत ८ पुस्तके व ५८ शोधनिबंध प्रकाशित झालेले असुन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकुण ८६ पेक्षाही अधिक चर्चासत्रामध्ये त्यांनी शोध निबंधाचे वाचन व सहभाग नोंदविलेला आहे. भूगोल विषयातील विद्यार्थ्यांचा संशोधनाकडे कल वाढवा यासाठी त्यांनी ४ पेटेंट प्रकाशित केलेले आहे. तसेच त्यांनी केलेल्या उल्लेखनिय शैक्षणिक कार्याबद्दल ३ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची अभ्यास मंडळावर निवड झाली आहे. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव विधिज्ञ संजीव कुलकर्णी, विश्वस्त मा. संदीप रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस.यादव, महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर-कर्मचारी, सर्व विद्यार्थी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. गणेश चव्हाण यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.