शेवगाव प्रतिनिधी, दि. १ : गो विज्ञान संशोधन संस्था पुणे, दादरा नगर हवेली मुक्ती संग्राम समिती अणि गोसेवा समिती दक्षिण नगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा या वर्षीचा’ श्रद्धेय मोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार २०२३ ‘ हा राज्यस्तरिय ‘आदर्श गोशाळा पुरस्कार ‘ तालुक्यातील तळणी येथील हभप हरि महाराज घाडगे यांच्या श्रीकृष्ण गोशाळेस प्रदान करण्यात आला आहे.
राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नगर येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात हा पुस्कार देऊन हरि महाराज घाडगे यांना सन्मानित करण्यात आले . सन्मानचिन्ह, महावस्त्र व रुपये पाच हजार रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
आठवर्षांपूर्वी भाविकांनी आश्रमात आणून सोडलेल्या अवघ्या पाच गायी सांभाळत सुरु केलेल्या श्रीकृष्ण गोशाळेत आज तब्बल एकशे दहा गावरान गायी आहेत . या सर्व गायींच्या शेण शेणकुराची, चारा पाण्याची सर्व देखभाल हरि महाराज व त्यांचे आई वडिल प .पु .विश्वनाथ व सौ. भागिरथी बाई हे तिघे स्वतः पहातात. हभप हरि महाराज घाडगे कीर्तन प्रवचनाच्या निमित्ताने बाहेरगावी असले तरी त्यांचे आईवडिल गोशाळेच्या व्यवस्थेत कुठेही कमी पडू देत नाही. गोशाळेच्या या वैशिष्टयाची दखल पुरस्कारासाठी घेण्यात आली.
शेवगाव येथील ज्येष्ठ भाविक श्रीमंत घुले, अरविंद पटेल, जगदीश धूत, डॉ निरज लांडे पाटील, डॉ , पुरूषात्तम बिहाणी, डॉ.आशिष लाहोटी यांनी श्रीकृष्ण गोशाळेला मिळालेल्या पुरस्कारा बद्दल हरि महाराजांचा ताळणीला सत्कार केला. तेव्हा सत्काराला उत्तर देतांना महाराजांनी हा सन्मान गोमातेच्या चरणी व श्रीकृष्ण गोशाळेच्या उभारणी साठी तन मन धनानी मदत करणाऱ्या गोभक्तांना व आपले प्रेरणास्थान गुरुवर्य बंडातात्या कराडकर व गुरुवर्य संजय महाराज पाचपोर यांच्या चरणी अर्पण केला.