शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : तालुक्यातील आव्हाने बुद्रुकच्या सरपंचाच्या मनमानी कारभाराला कंटाळून एकाच वेळी पाच सदस्यांनी राजीनामे दिल्यामुळे ग्रामपंचायतीचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
आव्हाने बुद्रुक ग्राम पंचायतीमध्ये एकूण ११ सदस्य असून सरपंच पद लोकनियुक्त आहे. सरपंचासह ७ सदस्य राष्ट्रवादीचे तर ५ सदस्य विरोधी गटाचे आहेत. काल गुरुवारी (दि. ९ ) संतोष डुरे, कविता दिंडे, अर्चना वाघमोडे, सोमनाथ कळमकर व शशिकांत खरात या पाच सदस्यांनी सरपंचावर विविध आरोपांचा ठपका ठेवत एकत्रीत राजीनामा पत्र सरपंचाना सादर केले आहे.
यावेळी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, अनेकदा मागणी करूनही ग्रामसभा न घेता फक्त कागदोपत्री त्या झाल्याचे रंगविले जात आहे. प्रत्येक विकास कामात सर्व सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही. दिंडेवाडीला अक्षय योजनेच्या लाईटमध्ये जाणीवपूर्वक भेदाभेद करून अनेकांना प्रकाशापासून वंचित ठेवले आहे. तेथील विकास कामे देखील मुद्दाम टाळली आहेत.
तसेच खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी पर्यटन विकास निधीतून गावातील स्वयंभू निद्रिस्त गणपती देवस्थानाच्या सभा मंडपाला ५० लाख रुपयाचा निधी दिला असून हा सभा मंडप बांधण्यासाठी आव्हाने ग्रामपंचायतीने एक महिन्यापासून ना हरकत दाखला दिला नाही. तो द्यावा यासाठी वारंवार सूचना करूनही आतापर्यंत मुद्दाम टाळाटाळ करण्यात आली.
अशा प्रकारच्या मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही राजीनामा देत आहोत. जर असा भेदभाव करून आडवणूक होत असेल तर आमचे सभासदत्व काय फक्त मिरवण्यापुरते आहे काय? असा सवाल त्यांनी केला आहे.