शेवगाव प्रतिनिधी, दि. १५ : सुमारे पन्नास हजारावर लोकसंख्या असलेल्या शेवगावातील मुळात अरुंद असलेल्या रस्त्यावर व्यावसायिकांनी दोन्ही बाजूच्या गटारी वर सुद्धा अतिक्रमण करून आपला विस्तार केला आहे. याशिवाय त्याच्याही पुढे पलंग वा टेबल टाकून आपल्या आपल्या मालाचे प्रदर्शन करण्याची स्पर्धा असते.
तर ग्राहक त्याही पुढे आपले वाहन उभे करून दुकानात खरेदीसाठी जातो त्यामुळे दोन रिक्षा जरी समोरासमोर आल्या तरी त्यांना मार्गस्थ होण्यासाठी किमान अर्धा तास लागतो. रोजच वरचेवर होणाऱ्या अशा रहदारीच्या कोंडी मुळे शेवगावकर त्रस्त झाले आहेत.
या दैनंदिन अडचणीकडे नगरपपरिषदेसह पोलिसांचेही लक्ष नाही. शेवगावातील अरुंद बाजार पेठेतील रस्त्याचे रुंदी करण करण्याचे अनेक दिवसाचे भिजत घोंगडे ही मार्गी लागत नसल्याची अनेकांची नाराजी आहे.
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी सारख्या उत्सावाच्या निमित्ताने तर या अरुंद रस्त्यातच मध्यभागी पलंगाची रांग लागून त्यावर देखील दुकाने लागतात अशी स्थिती आहे. येथील मुख्य बाजार पेठ व मोची गल्ली या मार्गावर तरी किमान वन वे कार्यान्वित केला तर पन्नास टक्के वहातूक कोंडी कमी होऊ शकते तशी मागणी अनेकदा झाली आहे.