शेवगाव प्रतिनिधी, दि.१० : माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या पुण्यस्मरण निमित्त शारदीय नवरात्र उत्सवाच्या पावनपर्वात येथील माजी आमदार राजीव राजळे मित्र मंडळाच्या वतीने रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांच्या सुमधुरवाणीतून सोमवार दिनांक १६ ते रविवार दिनांक २२ ऑक्टोबर या कालावधीत श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने माजी नगरसेवक महेश फलके, सागर फडके यांनी दिली.
शहरातील खंडोबा नगर परिसरात उभारण्यात आलेल्या अयोध्या नगरी येथे दिनांक १६ते २२ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सायंकाळी सात ते दहा या वेळेत श्रीराम कथा आयोजित करण्यात आली आहे. सोमवारी दिनांक १६ रोजी ग्रंथ महात्म्य शिव पार्वती विवाह, मंगळवार दिनांक १७ रोजी श्रीराम जन्म कथा, बुधवार दिनांक १८ रोजी सीता स्वयंवर, गुरुवार दिनांक १९ रोजी केवट कथा, शुक्रवार दिनांक २० रोजी भरत भेट, शनिवार दिनांक २१ रोजी लंका दहन व रविवार दिनांक २२ रोजी रावण वध व श्रीराम राज्याभिषेक आदि प्रासंगिक उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.
आमदार मोनिका राजळे यांच्या पाठपुराव्यातून यंदाच्या नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित या उपक्रमाचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. शहरातील खंडोबा नगर परिसरात उभारण्यात येणाऱ्या भव्य आयोध्या नगरीत श्रीराम कथा संपन्न होणार आहे.