शेवगाव प्रतिनिधी, दि. १७ : महावितरणच्या विद्युत पुरवठ्याचा सावळा गोंधळ कमालीचा वाढला असून पुरवठ्याच्या वेळकाळास बंधन राहिले नाही. शेती पंपाना रात्रीच्या वेळी करण्यात येणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे तालुक्यातील वडुले खुर्द येथील दोघांचा काल सोमवारी बळी गेला आहे. कांद्याच्या रोपाला पाणी देण्यासाठी गेलेल्या आजोबा आणि नातवाचे वीजेच्या धक्क्याने निधन झाले. निवृत्ती टोपा आव्हाड (वय-७८) व दिपक सोपान पाखरे (वय-२६) असे या घटनेतील मयत आजोबा व नातवाचे नाव असून त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वडुले खुर्दतील वस्तीवर राहणारे वृध्द शेतकरी निवृत्ती आव्हाड रात्री वीजपुरवठा होत असल्याने कांद्याच्या रोपांना पाणी देण्यासाठी रात्री अडीचच्या सुमारास गेले होते. मात्र, तेथून गेलेल्या वायरमधील विद्युतप्रवाह जमीनीवर पडलेल्या तारेत उतरल्याने त्यांना वीजेचा जोरदार धक्का बसला. ते जोराने ओरडताच त्यांचा आवाज वस्तीवर गेला.
तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांच्या मुलीचा मुलगा दिपक पाखरे यास झोपेतून उठवून शेतात जाऊन पाहण्यास सांगितले. वीजप्रवाहाची कल्पना न आल्याने तो तेथे जाऊन आजोबांना उठविण्याचा प्रयत्न करत असताना त्यालाही वीजेचा धक्का बसला. त्यातच त्याचेही निधन झाले. नंतर परिसरातील ग्रामस्थ व कुटुंबातील व्यक्तीनी वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर दोघांवरही शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत दिपक विवाहित असून पाठीमागे पत्नी व मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, शेतीपंपाना रात्रीच्या वेळी केल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पीकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना अशा प्रकारे जोखीम पत्कारावी लागत असल्यामुळे एकाच कुटुंबातील दोघांचा हकनाक बळी गेल्याची संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.