कोपरगाव प्रतिनिधी,दि. १७ : सहकारी साखर कारखानदारीला संकटे नवीन नाहीत. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादन घटले होते तर यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे साहजिकच साखर कारखानदारीपुढे गाळप हंगामाचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्याचे मोठे आव्हान असले तरी हे आव्हान पूर्ण करून सर्वांच्या सहकार्याने गाळप हंगाम यशस्वी करू असा विश्वास कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी काळे यांनी व्यक्त केला आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा २०२३/२४ या वर्षाच्या ६९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे मार्गदर्शक व जेष्ठ संचालक माजी आमदार अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली व चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत चेअरमन डॉ. मच्छिंद्र बर्डे व त्यांच्या सुविद्य पत्नी चित्रा बर्डे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून करण्यात आला याप्रसंगी आ.आशुतोष काळे बोलत होते.
पुढे बोलतांना आमदार काळे म्हणाले की, मागील चार वर्ष मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाल्यामुळे ऊस टंचाई जाणवली नाही व पाण्याची देखील टंचाई भासली नाही. मात्र यावर्षी सलग ४० ते ४५ दिवस पावसाचा खंड पडल्यामुळे सर्वच पिकांबरोबर ऊस पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऊसाचा वापर चाऱ्यासाठी होत असल्यामुळे गाळपाला किती ऊस उपलब्ध होईल याबाबत अंदाज बांधणे कठीण असून यापूर्वी दुष्काळी परिस्थितीमुळे सन २०१६-१७ चा गाळप हंगाम ७३ दिवस व सन २०१९-२० चा ९६ दिवसाचा गाळप हंगाम झाला होता.
त्याचीच पुनरावृत्ती चालू वर्षी व पुढील वर्षी होवू शकते. त्यामुळे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन करून या परिस्थितीवर मात करावी लागणार आहे. त्यासाठी चालू हंगामात तुटणा-या ऊसाचे जास्तीत जास्त खोडवे ठेवून पाचट अच्छादन करावे. दुष्काळी परिस्थिती पाहता पुन्हा एकदा ऊस शेतीसाठी नव्हे तर सर्वच पिकांसाठी ठिबक जलसिंचनाचा व तुषार सिंचनाचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे निश्चितपणे पुढीलवर्षी काही प्रमाणात ऊस उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर- नाशिकच्या धरणातील पाणी साठ्याचा आढावा घेवून मेंढेगिरी समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार औरंगाबाद येथे होणाऱ्या बैठकीत जायकवाडीत पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मेंढेगिरी समितीची पाणी वाटप निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे नवीन समिती तयार करण्यात आली असून या समितीचा अहवाल आल्याशिवाय निर्णय घेवू नये. हि भूमिका वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडली होती. त्याबाबत न्यायालयात याचिका देखील दाखल केलेली आहे. ज्याप्रमाणे पैशाचे सोंग करता येत नाही त्याप्रमाणे पाण्याचे देखील सोंग करता येत नाही. पाण्यावर ग्रामीण आणि शहरी भागाचे अर्थकारण अवलंबून आहे. औरंगाबादच्या बैठकीत काहीही निर्णय झाला तरी जायकवाडीत पाणी सोडण्याला विरोध राहणार आहे. जायकवाडी धरण जवळपास ६० टक्केच्या आसपास भरलेले असतांना दुष्काळी परिस्थितीत ५ टक्यासाठी पाण्याची नासाडी कशाला? त्यामुळे जायकवाडीला पाणी जावू नये यासाठी एकजुटीने मोठे आंदोलन उभारावे लागेल. – आ. आशुतोष काळे
मागील वर्षीचा गळीत हंगाम पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या ११० टन क्षमतेचा बॉयलर, ८ मेगा वॅटचे टर्बाईन व चार मिलचे माध्यमातून यशस्वी केला आहे. दुसऱ्या टप्यातील आधुनिकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. ६००० मे.टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेले बॉयलिंग हाऊसची उभारणी करण्यात येवून इरेक्शनचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे.
मशिनरीच्या चाचण्या सुरु असून यावर्षीचा गळीत हंगाम पूर्णपणे नव्या आधुनिक कारखान्यावर घेण्यात येणार आहे. कारखान्याने नेहमीच ऊसाला जास्त दर देवून मुदतीच्या आत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पेमेंट दिल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कल आपल्याला ऊस देण्याकडे आहे. त्यामुळे गाळपाचे ठरविलेले उद्दिष्ट्य पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते कारभारी आगवण, बाळासाहेब कदम, पद्माकांत कुदळे, एम.टी. रोहमारे, ज्ञानदेव मांजरे, विश्वास आहेर, नारायण मांजरे, संभाजी काळे, सुनील शिंदे, भास्कर चांदगुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधव खिलारी, सिकंदर पटेल, राजेंद्र ढोमसे, अखिल भारतीय सरपंच महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब जपे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, सूर्यभान कोळपे, राजेंद्र घुमरे, दिलीप बोरनारे, शंकर चव्हाण, राहुल रोहमारे, श्रावण आसने, शिवाजी घुले, वसंत आभाळे, श्रीराम राजेभोसले, दिनार कुदळे, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप,
गंगाधर औताडे, इंदूबाई शिंदे, वत्सला जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदासजी केकाण, गौतम कुक्कुटपालनचे चेअरमन विजय कुलकर्णी, गौतम बँकेचे व्हा. चेअरमन बापू जावळे, गोदावरी खोरेचे संचालक दिलीप शिंदे,कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी एस. डी. शिरसाठ, तसेच सर्व सलग्न संस्थानचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अरुण चंद्रे यांनी केले तर संचालक दिनार कुदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.