शेवगाव प्रतिनिधी, दि.३० : येथील नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर मराठा आरक्षणा संदर्भात चालू असलेल्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस असून देखील कोणी वैद्यकीय अधिकारी तेथे फिरकले नसल्याच्या निषेधार्थ तसेच उपोषण कर्ते भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव, जोहरापूरचे माजी सरपंच अशोक देवढे व साखळी उपोषणात सहभागी असलेले कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, भायगावचे माजी सरपंच अशोक दुकळे, प्रहारचे तालुका अध्यक्ष रामजी शिदोरे,
भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, भगवान आढाव, मराठा महासंघाचे अनिल सुपेकर, शेतकरी बचावचे एकनाथ काळे यांना वैद्यकीय मदत मिळावी, आणि यासंदर्भातील दोषीवर निलंबनाची कार्यवाही व्हावी अशी मागणी करत सकल मराठा समाजाच्या वतीने भातकुडगाव फाटा चौफुल्यावर तब्बल दोन तास रस्ता रोको करण्यात आला.
यावेळी परिविक्षाधिन तहसीलदार राहुल गुरव यांनी मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेला सामोरे जाऊन या कामी कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल. असे सांगून भातकुडगाव आरोग्य केंद्राला लगेच लेखी सुचना करण्यात आल्याची माहिती दिल्या नंतरच रस्ता रोको मागे घेण्यात आला.
रस्ता रोको वेळी शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र आर्ले, शिक्षक बँकेचे काका घुले, तुकाराम शिंगटे, भाजपाचे विलास फाटके अविनाश महाराज लोखंडे तसेच सकल मराठा समाजातील अनेक मान्यवरांसह विद्यार्थी सहभागी झाले होते.