शेवगाव प्रतिनिधी, दि.१७ : शेवगाव शहरातून नगर, नासिक, औरंगाबाद, बीड कडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या मार्गावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे छोटे व्यावसायिक, वाहन चालक व नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु असल्याने उस वाहतुक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर जुगाड, बैलगाड्या, तसेच अंबड, जालना, शेंद्रे औद्योगिक वसाहतीतून येणाऱ्या अवजड साहित्यांची वाहतूक देखील शेवगावातूनच होत असते. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही असा दिवस जात नाही.
रविवारी (दि.१७) लग्न तिथ दाट होती. तशात शेवगावचा आठवडे बाजार देखील असल्याने वरचेवर मोठी वाहतूक कोंडी झाली. क्रांती चौकातून जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर किमान मैल दीड मैल वाहनाच्या दूतर्फा रांगा लागल्या होत्या. वाहने मुंगीच्या गतीने पुढे सरकत, त्यामुळे क्रांती चौकातून डॉ.आंबेडकर चोंकापर्यत जायलाच दोन अडीच तास लागत. त्यामुळे पैठण रस्त्यावरील मंगल कार्यालयातील लग्न लावून नगर रस्त्यावरील मंगल कार्यालयातील दुसऱ्या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावता आली नाही. अशी नागरिकांची त्रेधा उडाली.
विशेष म्हणजे शेवगावच्या आठवडे बाजाराला अजिबात शिस्त नाही. डॉ.आंबेडकर चौकात तर रस्त्याच्या एका बाजूने कोंबड्या व अंड्याचा बाजार भरतो तर दुसऱ्या रस्त्याच्या बाजूला भाजीपाला विक्रेते आपली पथारी लावतात. नेवासे मार्गावर तर रस्त्याच्या कडे सह मधल्या दुभाजका वर देखील भाजीपाला व फळाची दुकाने लागतात. या बाजाराला शिस्त लावण्यात नगरपरिषद तथा पोलिस प्रशासन ही हतबल झाले की काय? अशी शंका येते. कारण रस्त्यावर लागणारी ही दुकानदारी या अगोदर अनेकदा बंद करण्यात आली. मात्र, ती एखाद्या आठवडया नंतर पुन्हा सुरु झाल्याचा इतिहास आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी शेवगावाच्या बाह्य वळण रस्त्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागयला हवा. यावर्षी या कामाचे सर्वेक्षण व भूसंपादन प्रस्ताव तयार करुन सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यासाठी ६० लाखाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात शेवगाव बाहयवळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. फक्त तो लवकर मार्गी लागावा अशीच नागरिकांची अपेक्षा आहे.