शेवगाव प्रतिनिधी, दि.०२ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांची माहिती सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून समाजातील गरीब व गरजूंना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न सुरू असून त्याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ शेवगाव शहरात आमदार राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
तहसीलदार प्रशांत सांगङे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत, भाजपाचे बापूसाहेब पाटेकर, तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, भीमराज सागडे कचरू चोथे, नितीन दहिवाळकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी सदस्य नगरपरिषदेच्या विविध विभागातील अधिकारी कर्मचारी व महिलांची उपस्थिती होते.
शासनाच्या विविध योजनाच्या प्रचाराचा धडाका सध्या सर्व स्थरावर सरकारी खर्चाने मोठ्या जोमात सुरु आहे. मात्र, खरा लाभार्थी नागरिक अशा कार्यक्रमात अभावानेच आढळतो. याही कार्यक्रमासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला होता. मात्र, नागरिकांचा प्रतिसाद नव्हता. आयोजकांना देखील फक्त फोटोशेसनची नोंद करणे भाग असावे. हा कार्यक्रम सर्वत्र पोहचविणारी बहुतेक प्रसिद्धी माध्यमेही या बद्दल अनभिज्ञ होती.
मुख्याधिकारी राऊत यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. ते म्हणाले, समाजातील प्रत्येक घटकाला विकासाची संधी मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने लोकांसाठी विविध विकासाभिमुख योजना सुरू केल्या असून सर्वांचा विकास हे ध्येय बाळगून आयुष्यमान भारत कार्ङ योजना प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री सुनिधी उज्वला गॅस योजना, मुद्रा योजना अशा विविध कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून समाजातील गरीब गरजूंना बळ मिळून दिले.
वंचित घटकांनी भारत संकल्प यात्रेमध्ये सहभागी होऊन या योजनांचा लाभ घ्यायला हवा. यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेची चित्रफित दाखविण्यात आली. या यात्रेमध्ये लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ मिळावा यासाठी काही स्टॉल लावण्यात आले होते. उपस्थित बँकेच्या अधिकाऱ्यांनी समाजासाठी बँकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. नगरपरिषदेचे कर निरीक्षक दीपक कोल्हे, अंतर्गत लेखापरीक्षक अर्जुन बर्गे, लेखापाल सुग्रीव फुंदे, नगर अभियंता समाधान मुंगसे, पाणीपुरवठा योजनेच्या अभियंत्या पूर्वा माळी, संगणक अभियंता तोगे, शेकडे, विशाल, गोरख काळे, भारत चव्हाण यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. अर्जुन बर्गे यांनी सूत्रसंचालन केले. तर दीपक कोल्हे यांनी आभार मानले.