अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या कामास प्रशासकीय मान्यता – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ : जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजने अंतर्गत महायुती शासनाने कोपरगाव मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासाच्या विविध विकास कामांच्या ०४ कोटी ०७ लक्ष निधीच्या कामास प्रशासकीय मंजूरी देण्यात आली असल्याची माहिती आमदार काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव मतदार संघातील विविध विकास कामांना हजारो कोटीचा निधी मिळविणाऱ्या आमदार काळे यांनी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी देखील विविध विकास कामे मंजूर करून आणली असून त्या कामांना निधी देखील मंजूर करण्यात आला होता. या विकास कामांना लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी आमदार काळे यांचा पाठपुरावा सुरु होता.

त्या पाठपुराव्याची दखल घेवून होती त्या कामांना नुकतीच महायुती शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणे, रस्ता करणे, वीज पुरवठ्याची कामे करणे, पाणीपुरवठा योजनेची कामे करणे, सौर पथ दिवे बसविणे, बंदिस्त गटार, रस्ता खडीकरण, समाज मंदिर बांधकाम करणे, पोच रस्ता डांबरीकरण करून तसेच विविध रस्त्यांच्या मजबुती करण्याच्या कामाचा समावेश आहे.

मतदार संघातील ओगदी, बक्तरपुर, बहादरपूर, कोकमठाण, कान्हेगाव, कोळगाव थडी, कोळपेवाडी, कारवाडी, गोधेगाव, घोयेगाव, चासनळी, चांदेकसारे, चांदगव्हाण, दहेगाव बोलका, तीळवणी, पढेगाव, मढी बु., मोर्विस, मढी खु., मंजूर, माहेगाव देशमुख, मायगाव देवी, मुर्शतपुर, गणी, सडे, सुरेगाव, सांगवी भुसार, शिरसगाव, सावळगाव, संवत्सर, शहाजापूर, शहापूर, वडगाव, डाऊच बु., रांजणगाव देशमुख, लौकी, भोजडे आदी गावातील एकूण ६३ अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीतील ७१ विकास कामांना लवकरच प्रारंभ होणार आहे.

त्यामुळे या सर्व गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी आमदार काळे यांचे आभार मानले आहे.