कोपरगाव प्रतिनिधी, दि.०१ : श्रमसंस्कार शिबिरातून गावाचा इतिहास, संस्कृती तसेच नवीन गोष्टी शिकता शिकता विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व खुलते, असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व कोपरगाव एज्युकेशन सोसायटीच्या के.जे. सोमैय्या (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या डाऊच बु. येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराला आ. आशुतोष काळे यांनी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज करतांना ते बोलत होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधतांना आ. काळे म्हणाले की, श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थी जेव्हा वेगळ्या वेगळ्या गावाना भेट देतात तेव्हा विद्यार्थ्यांना त्या गावाचा इतिहास, संस्कृती, भौगोलिक परिस्थिती यांसह नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळत असते. या नवीन गोष्टी शिकता शिकता सेवा करता येते.
तसेच या श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त, नीटनेटकेपणा, एकोपा, जबाबदारीचे जाणीव व आत्मविश्वास उंचावण्यास मदत होते. सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य देखील विद्यार्थ्यांच्या हातून होते असेही त्यांनी पुढे बोलतांना नमूद करून आपली संस्कृती, आपले संस्कार यांचा विसर पडू न देता आपले स्वप्न पूर्ण करा असा मौलिक सल्ला आ. आशुतोष काळे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन आनंद चव्हाण, शिबिरार्थी विद्यार्थी एन.एस.एस. विभाग प्रमुख डॉ.बी.एस. गायकवाड व शिक्षकांसह सरपंच दिनेश गायकवाड, भिवराव दहे, धर्मा दहे, बाबासाहेब होन, भानुदास दहे, वसंत दहे, बाजीराव होन, आप्पासाहेब ढमाले, काशिनाथ दहे, जनार्दन होन, कांतीलाल दहे, संजय गायकवाड आदी उपस्थित होते.