शेवगाव प्रतिनिधी प्रतिनिधी, दि. ०६ : रविवारी (दि.३) शेवगाव-गेवराई मार्गावरील एका हॉटेल समोर झालेल्या गोळीबार प्रकरणी पाच जणांच्या विरोधात, सोमवारी शेवगाव पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश उर्फ पिण्या कापसे रा. अंतरवाली, ता. शेवगाव, याने दिलेल्या फिर्यादीवरुन राजेश गणेश राठोड, अर्जुन पवार दोघे रा बजरंगनगर ता. पुसद जि. यवतमाळ यांच्यासह इतर तीन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, ३ फेब्रुवारी रोजी चापडगाव रस्त्यावरील रसवंती गृह येथे बसलेलो असताना दोन मोटार सायकल वरील पाच जण तिथे आले.
त्यापैकी तीन इसमांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्टल मधून गोळीबार केला, परंतु गोळ्या लागल्या नाहीत. त्यांनतर पाचही इसम मोटार सायकल वरुन पळून गेले. यावेळी पाठलाग केला असता, गणेश राठोड हा मक्याच्या शेतात लपून बसलेला दिसला.
तिथे गेलो असता त्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र उजव्या हाताने वार अडविल्याने हाताच्या बोटांमध्ये, मनगटावर, खांद्यावर गंभीर दुखापत झाल्याचे फिर्यदिमध्ये म्हटले आहे.
या गुन्ह्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्याने गुंता वाढला असून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे तपास करीत आहे.