पतीला परमेश्वर माना, आई-वडिलांना अंतर देऊ नका – शर्मा


शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : ज्या घरात माणसे हसतात, ते घर जगातील सर्वात श्रीमंत घर होय. त्यामुळे माणसे सांभाळायला शिका. जन्मदात्या आई-वडिलांना अंतर देऊ नका. भावा-भावात तसेच जावा – जावात विवाद नकोत. महादेवाची भक्ती करताना पतीला परमेश्वर माना. शिवकृपेने आपल्याला काहीच कमी पडणार नाही असे प्रतिपादन शिवपुराण कथाकार  समाधान महाराज शर्मा यांनी दिला.

लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील जयंतीनिमित्त सुरू असलेल्या महाशिवपुराण कथेचे तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. शिव -पार्वती विवाह सोहळ्याच्या निमित्ताने श्रोत्यांच्या गर्दीने खंडोबा मैदान अक्षरशः फुलून गेले होते. कथेदरम्यान महाराजांनी रुद्र संहिता, सती पार्वती खंड यावर सविस्तर निरूपण केल्यानंतर शिव -पार्वती विवाह सोहळा मंगलमय वातावरणात व मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाला. यावेळी वऱ्हाडी म्हणून कथा नियोजन समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराज पुढे म्हणाले, शिवाच्या डोळ्यातील अश्रू पासून तयार झालेल्या रुद्राक्षाचा महिमा अगाध आहे. एक ते चौदा मुखापर्यंत असलेले रुद्राक्ष नियमांचे पालन करून धारण केल्यास अनेकविध फायदे आहेत. रुद्राक्ष धारण करणाऱ्यांनी मदिरापान तसेच मांसाहार करूनये आयुष्य सार्थकी लावायचे असेल तर गुरु शिवाय तरणोपाय नाही. महादेवाला ‘ जलाधार ‘  प्रिय आहे. त्याची मनोभावे आराधना करा, त्याच्यावर निष्काम प्रेम करा. संकटाच्या काळात भोलेनाथाचा धावा केल्यास तो भक्तांसाठी पळत येतो असा शिवमहिमा आहे, शेवटी मान्यवर निमंत्रितांच्या हस्ते महाआरती झाली.