आठ दिवसांनी नळाला येणारे पाणी आशुतोष काळेंनी तीन दिवसाआड आणले

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघासह कोपरगाव शहराला विकासाची दिशा दाखवून शहरातील माता भगिनींच्या अत्यंत जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून महिलांच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरविला आहे. हे महिला भगिनींसाठी खूप मोठे काम असून त्यांच्या कामाची पावती त्यांच्या पदरात टाकणे हे आम्हा महिला भगिनींचे कर्तव्य आहे. त्यामुळे बुधवार (दि.२०) रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आ. आशुतोष काळे यांना मतदानाच्या रुपात त्यांच्या कामाची पावती भरघोस मतदानातून  देणार असल्याचे कोपरगाव शहरातील निवारा परिसरात झालेल्या कॉर्नर सभेत महिलांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला असून कोपरगाव शहरातील विविध प्रभागात महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजितदादा पवार गट) अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवारा परिसरात कॉर्नर सभा घेण्यात आली यावेळी महिलांनी आपल्या भावना व्यक्त करतांना बोलक्या प्रतिक्रिया दिल्या.

यावेळी अनेक वक्त्यांनी कोपरगाव शहरासह मतदार संघाचा आ.आशुतोष काळे यांनी केलेला कायापालट व त्यामुळे नागरिकांच्या विकासाच्या अडचणी दूर झाल्याचे सांगितले. यावेळी महिलांनी देखील आपले मनोगत व्यक्त करतांना कोपरगाव शहराच्या कायमस्वरूपी सुटलेल्या पाणी प्रश्नाबद्दल आपल्या भावना व्यक्त करतांना अनेक महिलांनी सांगितले कि, कोपरगाव शहरातील महिला ज्या दिवसांची चातकासारखी वाट पाहत होत्या ते दिवस आ.आशुतोष काळे त्यांच्या अथक प्रयत्नातून आले आहेत.

आम्हाला कधी आठ तर कधी पंधरा दिवसांनी नळाला येणारे पाणी तीन दिवसाआड पूर्ण दाबाने स्वच्छ पाणी नियमितपणे येत आहे. गेली कित्येक वर्ष महिला भगिनींना ज्या चिंतांनी ग्रासले होत्या त्या चिंता आ.आशुतोष काळे यांनी कायमच्या दूर केल्या आहेत. तसेच महायुती शासनाने महिला भगिनींसाठी सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेचा कोपरगाव शहरासह मतदार संघातील सर्वच महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी स्वत:ची यंत्रणा उभी करून एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली.

त्यामुळे मतदार संघातील जवळपास ७७ हजार महिलांना माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी महिला भगिनींसाठी केलेल्या कामाची पावती बुधवार (दि.२०) रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदानातून देणार असून आ.आशुतोष काळे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास उपस्थित महिलांनी यावेळी व्यक्त केला.