कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : केवळ सत्ता स्थापनेसाठी राजकारण न करता, आपल्या समोरील तुल्यबळ विरोधक असो किंवा आपल्याच पक्षातील प्रतिस्पर्धी असो यांना अलगद चितपट करुन त्यांच वर्चस्व कसं कमी करता येईल याची रणनीती आखण्यात व डावपेच खेळण्यात देवेंद्र फडणवीस सध्यातरी यशस्वी ठरले.
विरोधकांच्या माध्यमातून विरोधक संपवले तर आपल्याच पक्षातील प्रतिस्पर्धी राजकीय डावपेचातून बाजूला सारुन सत्ता केंद्राचे प्रमुख पुन्हा एकदा आपणच आहोत हे आपल्या कौशल्याने सिध्द करणारे देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होतायत. भाजपसह महायुती सत्तेत आणण्यासाठी फडणवीस यांनी निवडणीकत बंडखोरी करणाऱ्यांना वेगवेगळे आमिष दाखवून त्यांचे बंड थंड केले. त्यामुळे राज्यातील जवळपास ४० जागांवर भाजप महायुतीच्या उमेदवारांना विजय मिळवता आला. प्रत्येक मतदार संघात फडणवीस यांनी खुप बारकाईने निवडणुकीला सामोरे जाण्याची व्युहरचना केल्यामुळेच या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून सत्तेत आले.
पक्षाला कधी कधी व्यक्तीपुढे माघार घ्यावी लागते. पक्षश्रेष्ठींनाही धक्कातंत्र बाजूला ठेवावे लागते. नेता निवडीसाठी अधिक वेळ घेणाऱ्या राज्यांत भाजपने धक्कातंत्र वापरले होते. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा अशा काही राज्यांची उदाहरणे समोर असताना तिथे भाजप धक्कातंत्र वापरू शकला; परंतु महाराष्ट्रात असे धक्कातंत्र भाजपला आणि त्याच्या दिल्लीतील नेत्यांना वापरता आले नाही. त्यामागे अनेक कारणे असली, तरी देवेंद्र फडणवीस नावाच्या आधुनिक चाणक्याने गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात जी कामगिरी करून दाखवली ती दुर्लक्षित करणे पक्षश्रेष्ठींना परवडणारे नव्हते. भलेही पक्षांतर्गत विरोधकांचा काटा काढून पक्षावर आपली हुकमत त्यांनी स्थापन केली असली, तरी त्यांच्याशिवाय पक्षापुढे अन्य सक्षम पर्याय नव्हता. भाजपच्या इतिहासात कधी नव्हे, एवढा विजय फडणवीस यांनीच मिळवून दिला आणि स्वबळावर सत्तेत येण्याच्या जवळ पक्षाला नेऊन ठेवले.
भाजपबरोबरच महायुतीला २३७ जागा मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. गंमतीने महायुतीतील तीनही पक्ष फडणवीसच चालवतात, असे म्हटले जाते. बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा, निकालानंतर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील काही आमदारांचाही पाठिंबा, अपक्षही मदतीला असे असल्यानंतर फडणवीस यांना डावलून अन्य नेत्याची मुख्यमंत्रिपदी वर्णी लावणे शक्यच नव्हते. भाजपने ११ दिवस वेळकाढूपणा का केला, हा स्वतंत्र संशोधनाचा मुद्दा आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपने मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घ्यावा असे एकीकडे सांगितले असताना दुसरीकडे सहा महिने तरी मुख्यमंत्रिपद द्या, असा आग्रह धरला होता; परंतु १७८ आमदारांचा पाठिंबा असलेल्या नेत्याला पुन्हा दुय्यम स्थान दिले असते, तर पक्षात वेगळाच संदेश गेला असता; शिवाय विरोधी पक्षमुक्त भारत करण्याच्या भाजपच्या स्वप्नाला तडा गेला असता. शिवाय ज्या पद्धतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फडणवीस यांचा किल्ला लढवत होता, ते पाहिले, तर भाजपच्या श्रेष्ठींना धक्कातंत्र वापरण्यात किती मर्यादा होत्या, हे स्पष्ट होत होते.
सत्ता खेचून आणायची एकाने आणि फळे चाखायची दुसऱ्याने असे काँग्रेसमध्ये होते आणि त्याचा परिणाम काँग्रेसला भोगावा लागतो आहे, हे भाजपला ज्ञात नाही, असे थोडेच आहे. आजवर फडणवीस यांचे ब्राह्मण असणे हे त्यांचे मुख्यमंत्री होण्याच्या विरोधात होते. याशिवाय महाराष्ट्र भाजपमध्येही त्यांच्यावरून मतभेद होते; पण या विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश आणि फडणवीस यांनी केलेले काम कोणालाही नाकारता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री होण्यात त्यांची बाजू पक्की झाली होती. त्यामुळे भाजपपुढे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नव्हता.
फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे चाणक्य म्हणून उदयास आले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी कथित गद्दारी करत मुख्यमंत्रिपदाचा हट्ट धरला. त्यानंतर फडणवीस यांनी शरद पवार यांच्यासारख्या बलाढ्य राजकारण्याच्या जबड्यातून अजित पवारांसारख्या नेत्यांना खेचून आणले; पण त्यावेळी अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या आमदारांना आपल्यासोबत आणता आले नाही. त्यामुळे त्यांचा खेळ अवघ्या ८० तासांतच संपला. फडणवीस यांचे हे पहाटेचे औट घटकेचे सरकार पडले; पण फडणवीस यांनी आपले प्रयत्न सोडले नाही. त्यामुळे भाजपला त्यांच्या जोरावरच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडता आली. या फुटीमुळे फडणवीस टीकेचे धनी ठरले; पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. उद्धव ठाकरे यांच्यापासून मनोज जरांगे यांच्यापर्यंत सर्वांनी फडणवीस यांना त्यांची राजकीय कारकीर्द संपवण्याची धमकी दिली.
शरद पवार यांनी तर कथितपणे त्यांची जातच काढली; पण त्यानंतरही फडणवीस डगमगले नाहीत. महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी भाजपचा वारू पुढे नेण्याचे काम केले. त्यानंतर आपल्या पक्षाला पुन्हा सत्तेत आणून दाखवण्याचा करिश्माही करून दाखवला. फडणवीस हे ब्राह्मण असल्यामुळे मागासवर्गीयांचे राजकारण लक्षात घेता मध्यप्रदेशाच्या धर्तीवर एखाद्या फारशा चर्चेत नसणाऱ्या ओबीसी नेत्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद सोपवण्याचाही आग्रह धरला गेला. भाजपने गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेशात हा प्रयोग केला; पण महाराष्ट्राची परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे, हे कळून चुकल्याने दिल्लीकरांना वेगळा मार्ग अवलंबता आला नाही. महाराष्ट्रात सहा पक्षांनी निवडणूक लढवली. त्यात तीन पक्षांना बहुमत मिळाले. त्यापैकी एखादा पक्ष नाराज झाला तर नवे समीकरण अस्तित्वात येण्याची शक्यता आहे, हे भाजपला चांगलेच ठावूक आहे. यामुळेच भारतीय जनता पक्षाला येथे ‘सोशल इंजिनीअरिंग’ विसरून फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करावे लागले. विशेष म्हणजे फडणवीस यांच्याकडेच महायुतीमधील सर्व पक्षांची सूत्रे आहेत. एवढेच नाही तर साम, दाम, दंड, भेद वापरून सरकार चालवण्याची ताकद त्यांच्या अंगी आहे. भाजपच्या दिल्लीस्थित नेतृत्वाला फडणवीस यांची राजकीय उंची व लोकप्रियतेची जाणीव होती. त्यामुळेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अधिकाधिक प्रचार सभा घेण्याचा अधिकार देण्यात आला होता. त्यांच्या ब्राह्मण असण्याने किंवा त्यांच्या कार्यपद्धतीवर मतदार चिडले असते, तर कदाचित त्यांना पक्षाचा मुख्य चेहरा बनवून बढतीची बक्षीशी दिली गेली नसती.
फडणवीस यांनी महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्यासारख्या भाजपच्या बड्या नेत्यांहून जास्त सभा घेतल्या. साहजिकच या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांना बाजूला सारून एखाद्या नव्या नेत्याला मुख्यमंत्री केले, तर पक्षांतर्गत असंतोष वाढण्याची भीती होती. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती; पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या समर्थनार्थ पुढे येऊन त्यांना त्यांच्या पदावर कायम राहण्याची विनंती केली होती. ही एक मोठी घटना होती. संघ अशा पद्धतीने कुणाचीही बाजू घेण्यासाठी स्वतःहून पुढे येत नाही. फडणवीस यांच्या यांच्या घरी संघ व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत यासंबंधीची बैठक झाली होती. त्यानंतर बावनकुळे यांनी बाहेर येऊन पक्षाने फडणवीस यांना त्यांच्या पदावर कायम राहण्याची विनंती केल्याचे सांगितले होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या अनपेक्षित विजयात संघाचाही महत्त्वाचा वाटा होता, हे कुणापासून लपून राहिलेले नाही. संघावर प्रत्येक वेळी विश्वास व्यक्त करणारे नेते म्हणजे फडणवीस. यासोबतच फडणवीस हेच एकमेव नेते आहेत, ज्यांच्यावर मोदी व शाह यांचाही विश्वास आहे. देशाच्या जीडीपीच्या १३ टक्के महसूल एकट्या महाराष्ट्रातून येतो. आजही देशात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक याच राज्यात येते. यंदाच्या आकडेवारीनुसार, पहिल्या तिमाहीत थेट परकीय गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. अशा राज्यात फडणवीस यांनी प्रशासक म्हणून आपला ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रात अजूनही मोदी यांचा महत्वाकांक्षी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण व्हायचा आहे. याशिवाय पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा मार्गही महाराष्ट्रातून जातो. त्यामुळे फडणवीस यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीला मुख्यमंत्री करणे ही भाजपची मजबुरी आहे.
गेल्या पाच वर्षांतील राजकीय घडामोडी ज्या नेत्यांभोवती फिरल्या, त्यात फडणवीस यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागते. सर्वाधिक आमदार असतानाही शिवसेना-भाजप युती तुटल्यामुळे हातचे गेलेले मुख्यमंत्रिपद असो की, महाविकास आघाडीचे सरकार कोसळ्यानंतर मुख्यमंत्रिपदा ऐवजी उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागण्याचा प्रसंग, की लोकसभा निवडणुकीत मिळालेला दारूण पराभव; फडणवीस यांनी संयम कधीच सोडला नाही. आता त्यांना त्याचे फळ मिळाले आहे. ४० वर्षानंतर फडणवीस हे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरले. फडणवीस यांनी मोदी यांच्याच कार्यशैलीचा अवलंब केला. त्यांना अनेक संकटाचा सामना केला; पण त्यांनी केवळ पक्षांतर्गत शत्रुत्वावर नियंत्रणच ठेवले नाही, तर मित्रपक्ष शिवसेनेकडून निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीलाही हाताळले. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर महाराष्ट्रात भाजपला फडणवीस यांचा चेहरा मिळाला आहे. महायुती सरकारच्या काळात सत्तेत बरोबरीचा वाटा मिळत नसल्याची भाजप कार्यकर्त्यांची तक्रार होती. आता ती नाराजी दूर होणार आहे.
महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा, जिल्हा बँका, महानगरपालिका अशा सर्वच ठिकाणी भाजप ताकदीने लढणार आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले आहे. आता या पुढील निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड देण्याची रणनीती भाजप आखत आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावरही आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपचे मागील अनेक वर्षात प्रयत्न सुरू आहेत. आता सत्तेत आल्यानंतर हेच प्रयत्न पुन्हा जोमाने करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. सहकार क्षेत्रापासून ते स्थानिक राजकारणात भाजप आपली ताकद वाढवणार आहे. महाराष्ट्रातही आता राजकारणाचा गुजरात पॅटर्न राबवला जाणार आहे. हा पॅटर्न यशस्वी करण्यासाठी फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही, यावर भाजपच्या पक्षश्रेष्ठींचे यावर एकमत आहे. केंद्र आणि राज्याचे संतुलन ठेवण्यासोबतच राज्यात भाजप मित्रपक्षाची सगळी समीकरण जुळवण्यासाठी फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही आक्रमक नेत्यांना एकञ आणुन शांत करीत सत्तेचे वाटेकरी केले आणि फडणवीस यांनी विरोधकांचे पंख छाटले. वर्षानुवर्षे सत्तेत राहणाऱ्यांना अलगद बाहेरचा रस्ता दाखवणारे फडणवीस आज राजकारणातील चाणक्य ठरले आहेत.