नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले, २ डिसेंबरला मतदान

काळे कोल्हेंचा राजकीय आखाडा सुरु होणार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : कोपरगाव नगरपालीकेच्या निवडीसाठी काळे-कोल्हेसह सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु झाली असुन निवडणूक आयोगाने नुकतीच स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक प्रक्रिया जाहीर केली असल्याने आता खऱ्या अर्थाने काळे-कोल्हे यांचा राजकीय आखाडा सुरु झाला आहे तर कार्यकर्ते पदाधिकारी यांची उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड सुरु होणार आहे. कोण कोणाच्या गटात जाणार , कोण कोणाच्या बाजूने झुकणार, कोणाचा पाठींबा कोणाला मिळेल, नगराध्यक्ष पदासह नगरसेवका पदासाठी कोणाला कोणत्या गटाकडून उमेदवारी मिळणार याकडे कोपरगाव शहरासह तालुक्याचे  लक्ष लागले आहे.

नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली असून मतदानाची तारीख २ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. पालिका निवडणुकीसाठी शहरात एकूण  ६३ हजार ४४८  मतदार असून त्यात ३१ हजार १३२ पुरुष, ३२ हजार ३१२ स्री व इतर चार असे मतदार आहेत. यांच्या मतांवर नगराध्यक्षासह नगरसेवकांचे भवितव्य अवलंबून असले तरीही मतदारांना कोण कसे आपल्या बाजूने आकर्षीत करताय यावर बरेच काही चिञ अवलंबून आहे.

एकुण १५ प्रभागातून ३० नगरसेवक व  नगरसेविका निवडायचे आहे. एका प्रभागातून दोन नगरसेवकांना निवडून द्यावे लागणार आहे. निवडणुकीची संपूर्ण तयारी कोपरगाव नगयपालीकेच्यावतीने सुरु आहे.  निवडणुकीसाठी आवश्यक सर्व तयारीला प्रशासनाने सुरुवात केली असून मतदार याद्या, मतदान केंद्रांची व्यवस्था, सुरक्षा यंत्रणा आदींचे नियोजन सुरू आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोग दरवर्षी विविध उपक्रम राबवते ते यावर्षी देखील राबविले जाणार आहेत.

आज पासुन आचारसंहिता लागू झाल्याने नगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रात नवीन विकासकामांच्या घोषणा, निधी वितरण, शासकीय जाहिराती तसेच कार्यक्रमांवर बंदी लागू झाली आहे. निवडणूक पारदर्शक, मुक्त आणि निष्पक्ष होण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान कोपरगाव मध्ये काळे विरूद्ध कोल्हे ही पारंपरिक लढत असते माञ सध्या आमदार आशुतोष काळे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असुन त्यांच्या पक्षाची राज्य पातळीवर भाजप शिवसेना यांच्याशी महायुती आहे तर  माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे हे भाजपशी गेल्या अनेक वर्षांपासून एकनिष्ठ असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे ते विश्वासु आहेत त्यामुळे काळे कोल्हे हे सध्या एकाच आघाडीत जरी असले तरीही नगरपालिका निवडणुकीत ते आघाडीची बिघाडी करतात का?, कार्यकर्ते काळे कोल्हे यांच्या आघाडीत एकवटून नगरपालीका लढतील का? काळे कोल्हे युतीचा धर्म खरच पाळतील  का? हे सर्व प्रश्न कोपरगावसह जिल्ह्यातील नागरीकांना पडला आहे.

जर काळे कोल्हे एकमेकांच्या विरोधात राजकीय आखाड्यात उतरले तर महाविकास आघाडीचे स्थानिक कार्यकर्ते स्वतंत्र निवडणुकीची तयारी करतील की, काळे कोल्हेंच्या गटात विभागले जातील. दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, आणि स्वतःला निष्ठावंत म्हणत भाजपच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते एकमेकाविरूध्द लढण्याची भाषा करत असतात त्यामुळे  कोपरगावचे  सध्याचे राजकारण व निवडणुकीची रंगत जिल्ह्यात लक्षवेधी असणार आहे.

काहीही झाले तरी काळे कोल्हे यांच्या भुमिकेवर सर्व काही चिञ स्पष्ट होणार आहे. वरिष्ठ नेत्यांचे आदेश कोणाला युती धर्म पाळण्यासाठी असतील , कोण कोणाच्या आदेशाचे पालक करतील हे येणाऱ्या काळात जरी ठरणार असले तरीही खालच्या पातळीवर सर्व काही संभ्रमात आहेत.

Leave a Reply